मुंबई : मुंबई-पुण्यात दीर्घकालीन भाडेकरारावर घेतल्या जाणार्या कार्यालयीन जागांच्या मागणीत यावर्षी वाढ झाली आहे. 2025च्या पहिल्या सहामाहीत मुंबईतील 4.5 दशलक्ष चौरस फूट आणि पुण्यातील 3.8 दशलक्ष चौरस फूट जागा विविध कार्यालयांसाठी दीर्घकालीन भाडेकरारावर देण्यात आली.
गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीचा विचार करता मुंबईत 3.15 दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागा दीर्घकालीन भाडेकरारावर देण्यात आली होती. त्यात यावर्षी 43 टक्के वाढ झाली व 4.5 दशलक्ष चौरस फूट जागा भाड्याने देण्यात आली. पुण्यात गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत केवळ 1.32 दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागा भाड्याने देण्यात आली होती.
यावर्षी त्यात तब्बल 188 टक्के वाढ झाली. यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत 3.8 दशलक्ष चौरस फूट जागा भाड्याने देण्यात आली. अॅनारॉकने सर्वेक्षण केलेल्या 7 महत्त्वाच्या शहरांपैकी पुण्यात दिसून आलेली वाढ सर्वाधिक आहे.
बाजारात नव्याने दाखल झालेल्या कार्यालयीन जागांचे प्रमाण मुंबई महानगर प्रदेशात गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्क्यांनी घटले. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत 3.47 दशलक्ष चौरस फूट इतकी कार्यालयीन जागा नव्याने उपलब्ध झाली होती. यावर्षी मात्र याच कालावधीत केवळ 1.9 दशलक्ष चौरस फूट जागा नव्याने उपलब्ध झाली. नव्या जागांच्या बाबतीत पुण्यात तब्बल 533 टक्के वाढ दिसून आली. गेल्या वर्षी केवळ 0.9 दशलक्ष चौरस फूट जागा नवीन होत्या. यावर्षी त्यांचे प्रमाण 5.7 दशलक्ष चौरस फूट होते.