

मुंबई : परिचारिकांच्या मागण्या मान्य केलेले परिपत्रक बुधवारी काढू, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले होते, मात्र याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने परिचारिकांचा संप सुरूच राहणार आहे. परिचारिकांच्या संपामुळे आता वॉर्ड ओस पडू लागल्याचे चित्र समोर येत आहे.
राज्यातील सुमारे 45000 परिचारिकांनी गेल्या गुरुवारपासून समान वेतन, रिक्त पदांवर नियुक्ती आणि भत्ते या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांत रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी नियमित येतात, जे. जे. रुग्णालयात वॉर्डमध्ये बेड रिकामे नसल्याचे चित्र पाहायला मिळत होते. जागेअभावी काही रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत, मात्र आता अनेक वॉर्ड रिकामे आहेत. मेडिसिन वॉर्डमध्ये फक्त चार ते पाच रुग्ण असून, त्यांच्यावर शिकाऊ परिचारिकेकडून उपचार केले जात आहेत. रुग्णांना नव्याने दाखल करून घेतले जात नाही.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सरचिटणीस सुमित्रा तोटे म्हणाल्या, की मंगळवारी परिचारिका संघटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक झाली होती. दरम्यान, सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले आहे, परंतु ते लेखी स्वरूपात बुधवारी देण्यात येतील असे सांगितले होते मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत याबाबत परिपत्रक काढले नसल्याने संप सुरूच राहणार.