

मुंबई : जगात सापांच्या तीन हजारहून अधिक प्रजाती आढळतात. भारतातही सुमारे 69 प्रजाती अत्यंत धोकादायक मानल्या जातात. पण विषारी नसला तरी एका सापाची किंमत एखाद्या आलिशान गाडीपेक्षा किंवा बंगल्यापेक्षाही जास्त आहे.
या दुर्मीळ सापाचे नाव आहे रेड सँड बोआ. त्याला भारतात ‘म्हांडुळ’ किंवा ‘दुतोंड्या’ साप म्हणूनही ओळखले जाते. रेड सँड बोआ सापाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटीपासून ते 25 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. यामागे अनेक कारणे आहेत. लैंगिक शक्ती वाढवणार्या औषधांमध्ये या सापाचा वापर केला जातो, असा गैरसमज आहे. अनेक तांत्रिक विधींमध्ये या सापाचा वापर केल्यास नशीब उजळते किंवा गुप्त धन मिळते, अशी अंधश्रद्धा समाजात आहे. हा साप प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्राच्या काही भागांत आढळतो. या सापाची वाढती तस्करी आणि घटती संख्या पाहता भारत सरकारने वन्य जीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत या सापाला संरक्षित घोषित केले आहे. त्यामुळे या सापाला पकडणे, जवळ बाळगणे, विकणे किंवा त्याची तस्करी करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.