

Devendra Fadnavis on Sanjay Gaikwad
मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना आमदार निवासाच्या कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणे महागात पडणार आहे. या प्रकरणी कारवाईचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. त्यासाठी कोणी तक्रारदार असल्याची आवश्यकता नाही, असे फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.११ जुलै) सांगितले.
या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी, आमच्याकडे गायकवाड यांच्याविरोधात कोणतीही तक्रार आली नसल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, याची निश्चितपणे पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. पोलीस याची चौकशी करतील. दखलपात्र गुन्हा असेल तर पोलिस योग्य कारवाई करतील. फोर्स करताना किती वापरला? तेदेखील महत्त्वाचे असते. दखलपात्र आणि अदखलपात्र असे प्रकार असतात. यातील कोणते ते निश्चित करावे लागेल.
संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर गायकवाड यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आपल्या कृतीचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे गायकवाड यांनी सांगत, 'जीवाशी खेळाल, मी सोडणार नाही', अशी धमकीही दिली. दरम्यान, हा मुद्दा विधीमंडळ अधिवेशनातही उपस्थित झाला. त्यावर फडणवीस यांनी, असे वर्तन योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली. संजय गायकवाड यांचे वर्तन भूषणावह नाही, यातून सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये चुकीची भावना जात असल्याचे फडणवीस यांनी म्हणत नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात कँटीन चालवणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) निलंबित केला आहे. शिळे जेवण दिल्याचे सांगत संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.