

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येमागे कोणताही घातपात नसून, त्याला या आत्महत्येला कुणीही प्रवृत्त केल्याचा पुरावा नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे. या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने शनिवारी मुंबईतील विशेष न्यायालयात सादर केला.
सुशांतची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयात तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने हा क्लोजर रिपोर्ट सादर केल्याने त्याला विशेष महत्त्व आले आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी त्याच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह दाखल करत तक्रार केली होती. तसेच, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांत सिंहच्या कुटुंबीयांविरोधात याचिका दाखल केली होती. या दोन्ही प्रकरणांचा सीबीआयने तपास केला. त्यानंतर सुशांत सिंहचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाल्याचे सीबीआयने जाहीर केले आहे.
या प्रकरणी सीबीआयने एम्सच्या न्यायवैधक शाखेच्या तज्ज्ञांची मदत घेतली होती. या न्यायवैधक शाखेच्या तज्ज्ञांनी सुशांत सिंह याच्या मृत्यूमागे घातपात नसल्याचे सांगत हा मृत्यू आत्महत्येमुळेच झाल्याचा तसेच त्याच्यावर कोणताही विषप्रयोग झालेला नाही आणि त्याचा दुसर्या कुणी गळादेखील आवळला नसल्याचा अहवाल सीबीआयला दिला होता.
सुशांतने 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केली होती. मुंबई पोलिसांच्या तपासात हा मृत्यू आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. या तपासात सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा आढळला नव्हता. सुशांतने नैराश्येमुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक दावा मुंबई पोलिसांनी केला होता. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबियांनी बिहारच्या पाटणा पोलिसांकडे रिया चक्रवर्ती आणि इतर काही जणांविरुद्ध सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात हद्दीचा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर बिहार सरकारच्या मागणीवरून केंद्र सरकारने हा तपास 19 ऑगस्ट 2020 रोजी सीबीआयकडे सोपवला होता.