

मुंबई : पुढारी वृत्तसेवा दिवाळी संपली तरी एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट अद्यापपर्यंत मिळालीच नाही. अधिकारी व प्रशासनाच्या उदासीन कारभरामुळे भेट मिळू शकली नाही. त्यामुळे मंजूर करण्यात आलेली ६ हजार रुपये दिवाळी भेट दैनंदिन प्रवासी उत्पन्नातून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने गेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्यात येते. या वर्षी महामंडळाने कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट देण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे महामंडळाच्या अध्यक्षांकडे ठेवला होता. विशेष म्हणजे हा प्रस्ताव विधानसभा आचारसंहितेपूर्वी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला तत्काळ मंजुरीही देण्यात आली. दिवाळी भेट देण्यासाठी ५२ कोटी रुपये इतक्या निधीची आवश्यकता होती.
या निधीच्या मागणीचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने सरकारकडे पाठवला होता. या निधीबाबत प्रशासनाने अनेकदा विचारणा करूनही राज्य सरकारकडून निधी देण्यात आला नाही. मात्र आता आचारसंहितेचे कारण पुढे करत दिवाळी भेट देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. दिवाळी भेट देण्यासाठी निधी प्राप्त करून देण्यात अधिकारी व एसटी प्रशासन दोघेही उदासीन असून त्यांनी ठरवले असते तर मार्ग निघू शकला असता, असा आरोपही बरगे यांनी केला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना दैनंदिन प्रवासी उत्पन्नातून ६ हजार रुपये तातडीने देण्यात यावेत व आचारसंहिता संपल्यावर सदरचा निधी सरकारकडून मागून घ्यावा, अशी मागणी बरगे यांनी केली आहे.