

मुंबई : दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी होणार्या नीट-एमडीएस 2025 प्रवेश परीक्षेची किमान पात्रता टक्केवारी कमी करण्यात आली आहे. आयुर्विज्ञान अंतर्गत राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची नवी संधी मिळाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने नोंदणीबाबत नव्याने अधिसूचना जारी केली आहे.
पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची राज्यातील जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षामार्फत राबवण्यात येते. त्यानुसार नीट-एमडीएस-2025 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षेला सीईटी कक्षाकडून सुरूवात करण्यात आली आहे. राज्यातील 529 जागांसाठी एकहजाराहून अधिक अर्ज आले होते. त्यावेळी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी याआधी सर्वसाधारण व ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 50 टक्के पात्रता व 261 गुणांची अट होती. मात्र सुधारित नियमांनुसार ती मर्यादा कमी करून 30.137 टक्के व 197 गुण करण्यात आली आहे.
दिव्यांग (सर्वसाधारण प्रवर्ग) उमेदवारांसाठी पात्रता 45 वरून 25.137 टक्के झाली असून कट-ऑफ 244 वरून 182 इतका करण्यात आला आहे. तर आरक्षित प्रवर्गासाठी यामध्ये दिव्यांगांचाही समावेश असून पात्रता 40 वरून 20.137 टक्के झाली असून कट-ऑफ 227 वरून 168 इतका खाली आणला आहे. या नवीन पात्रता टक्केवारीत जवळपास 19.8 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. पूर्वीची पात्रता टक्केवारी अधिक असल्यामुळे अनेक विद्यार्थी अपात्र ठरत होते. मात्र आता मर्यादा घटवल्याने प्रवेशासाठी नव्याने पात्र होणार्यांना नोंदणीची संधी मिळाली आहे.
या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून सीईटी सेलने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 18 ते 20 ऑगस्ट रात्री 11.59 वाजेपर्यंतच ठेवली आहे. यासाठी नोंदणी शुल्क 3 हजार रुपये असून, ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारेच भरणे आवश्यक आहे. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे रंगीत स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात अपलोड करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. 21 ऑगस्ट रोजी नव्याने नोंदणी केलेल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली जाणार आहे. त्याच दिवशी नीट-एमडीएस 2025 साठी राज्यस्तरीय एकत्रित प्राथमिक गुणवत्तायादी देखील जाहीर होणार आहे.
असे आहे वेळापत्रक
नोंदणी व शुल्क भरणा : 18 ते 20 ऑगस्ट, रात्री 11.59 पर्यंत
कागदपत्रे अपलोड : 18 ते 20 ऑगस्ट
नवीन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसह यादी : 21 ऑगस्ट
प्राथमिक राज्यस्तरीय गुणवत्ता यादी : 21 ऑगस्ट