

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची विधानसभा (Maharashtra Assembly) उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचा प्रस्ताव आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी विराजमान झाल्याचा मला मनापासून आनंद आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले.
''भारताचे संविधान किती मोठे आहे. चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले. ऑटो रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री झालेत. आता तर टपरीवर ज्यांनी काम केले ते उपाध्यक्ष झालेत. याबद्दल विरोधकांचेदेखील स्वागत करतो. कारण त्यांनी ही निवडणूक बिनविरोध केली.'' असे फडणवीस विधानसभेत म्हणाले.
विधानसभा उपाध्यक्षपदी आमचे सहकारी अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडलेले असे अण्णांचे व्यक्तिमत्व आहे. नार्वेकर यांच्यासारखा विधिज्ञ बसलेले असतात. आता अण्णा त्यांचे सहकारी म्हणून काम करतील. आपल्या दोघांच्या समन्वयातून न्याय सभागृहाला मिळेल, अशी आशा फडणवीस यांनी व्यक्त केली.
पुढे आणखी चांगले पद भूषवा. हे पद चांगलेच आहे. पण आणखी चांगल्या पदावर जावे. स्टँडिंग कमिटी चेअरमन हे पद म्हटले की अंडरस्टँडिंग म्हणतात. तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालला. सर्वसामान्यांचे जगणे माहिती असलेला नेता म्हणजे अण्णा बनसोडे आहेत. पिंपरीला आजपर्यंत मंत्रीपद मिळाले नसले तरी तुमच्या रुपाने संविधानिक पद मिळाले. मी अण्णांना विनंती करतो की, या खुर्चीवर दोन्ही कान शाबूत ठेवावेत. डावीकडील बाजुचे ऐका पण इकडचे पण ऐका. झिरवळ साहेब गमतीने म्हणायचे, मला डाव्या कानाने ऐकू येत नाही. त्यामुळे दोन्ही कानाने ऐका. विरोधी पक्षाला आता संधी नाही. विरोधी पक्ष असमाधानी असतो. समाधानी झाला तर तो विरोधी पक्षच नाही. त्यामुळे तुम्ही असमाधानी राहा, असे फडणवीस म्हणाले.
''नगरसेवक, स्थायी समिती आमदार आणि आता उपाध्यक्षपद मिळाले. अण्णांच्या शरीर यष्टीवर जाऊ नका. हल्ली नेत्यांना आपल्या सावलीवरदेखील विश्वास नसतो. अजितदादांची सावली अशी अण्णांची ओळख आहे. अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात अण्णा असतात. अण्णा आता फक्त अजितदादांकडे बघून चालणार नाही. आमच्याकडेही बघावे लागेल'', असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अण्णा बनसोडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. या पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली.