

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांचा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर हल्लाबोल सुरुच आहे. मुंडे कृषीमंत्री असताना एकूण २४५ कोटींच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप दमानिया यांना केला. दरम्यान, दमानियांचे हे आरोप केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी असल्याचे प्रत्युत्तर मुंडे यांनी मंगळवारी दिले.
''महाराष्ट्रातील ४ लाख शेतकऱ्यांना नॅनो खत मिळाले आहे. पण दमानिया यांचे केवळ सनसनाटी निर्माण करणे सुरु आहे. त्या नुसत्या धांदात खोटे आरोप करत आहेत. शेतकऱ्याला कधी पेरणी करावी लागते? त्यासाठी काय लागते? हे अंजली दमानिया यांना माहिती नाही,'' असा सवाल मुंडे यांनी केला. खोटे बोलणे आणि सणसनाटी निर्माण करणे दमानिया यांनी सोडून द्यावे, असेही ते म्हणाले.
माझे मीडियाला चॅलेंज आहे. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप कुठे तरी टिकले आहेत का? खरे ठरले आहेत का? असाही दावा मुंडे यांनी केला. दमानिया यांनी असे समजू नये की आम्हाला बोलता येत नाही. एक विषय शांत झाला की दुसरा विषय. माझ्यावर आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले आहे? त्याबद्दल दमानिया यांना शुभेच्छा आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
५९ दिवस एकाच माणसाचे आणि एका जिल्ह्याचे मीडिया ट्रायल होते. याच्या मागे कोण आहेत?. ज्यांच्यावर आरोप करत होत्या त्या अंजली दमनिया आज त्यांच्या घरी जात आहेत. त्यांनी माझ्याच नेत्यावर आधी आरोप केले होते. आज त्या त्यांच्या घरी कागद घेऊन जात आहेत, असेही मुंडे यांनी सांगितले.
मुंडे कृषीमंत्री असताना नॅनो युरिया, नॅनो डीएपी, कापूस बॅगा यांच्या खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाला आहे. नॅनो युरियाची ९० रुपयांची बाटली २२० रुपयांना खरेदी करण्यात आली. तसेच ५७७ रुपयांची नॅनो डीएपीची पिशवी १,२०० रुपयांना खरेदी केल्याचे सांगत या खरेदीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप दमानिया यांनी केला.