

NCC Style Training In Maharashtra School from First Standard
मुंबई : विद्यार्थ्यांना बालवयापासून शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा या हेतूने एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. तसेच यावर्षी स्वातंत्र्यदिन समारंभात देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांकडून कवायती सादर केल्या जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत एनसीसीचा राज्यातील विस्तार, प्रशिक्षणाचे स्वरुप, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आदींबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, एनसीसीचे संचालक जेनिष जॉर्ज, कर्नल संतोष घाग, लेफ्टनंट कर्नल अजय भोसले आदी उपस्थित होते.
20 हजार 314 विद्यार्थ्यांना जोडणार
या बैठकीत एनसीसीच्या अधिकार्यांनी राज्यातील एनसीसीची केंद्रे, प्रशिक्षकांची संख्या, प्रशिक्षणाचे स्वरुप आदींची माहिती दिली. सध्या राज्यात सात ग्रुप्स आणि 63 युनिट्स असून यात 1 हजार 726 शाळा, महाविद्यालयांतील 1 लाख 14 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. लवकरच यातील 10 केंद्रांचा विस्तार होऊन यात अधिकचे 20 हजार 314 विद्यार्थी जोडले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.