

मुंबई : सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद करणे, अपात्र किंवा शिक्षा भोगलेल्या व्यक्तींचे अर्ज वैध ठरवल्याप्रकरणी मुंबईतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिला आहे.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, आम्ही स्वबळावर लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसने 94 जणांना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये सर्वाधिक उत्तर भारतीय आहेत. ही निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर लढवली जावी. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काय आहे, हे येत्या 16 जानेवारीला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. मुंबईचा महापौर मुंबईकर होईल आणि तो राष्ट्रवादीचा होईल. तसेच, प्रभाग क्रमांक 135 मधून निवडणूक लढणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या एका मोठ्या नेत्याला निकालादिवशी धक्का बसेल, असा टोला त्यांनी लगावला.माझा भाऊ आणि विवाहित बहीण हे माझे कुटुंब नसून, ते माझे नातेवाईक आहेत. ते गेल्या पालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. या निकषावर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे, असे सांगत त्यांनी एकाच कुटुंबात तिकिटे हा मुद्दा फेटाळून लावला. मुंबईचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेस ठरवणार, असा दावाही त्यांनी केला.