

कोपरखैरणे : नवी मुंबईतील शाळेत सहामाही परीक्षेत एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीने कॉपी केल्याचा संशय आल्याने मुख्याध्यापिकेने तिला अन्य विद्यार्थ्यांच्या समोर झापल्याचा अपमान सहन न झाल्याने त्या विद्यार्थिनीने घरी आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली यानंतर शाळेत काय घडले? याबाबतची चौकशी मुलीच्या पालकांनी तिच्या मैत्रिणीकडे केली असता शाळेत घडलेला प्रकार त्या मैत्रिणीने सांगितला. त्यानंतर मृत विद्यार्थिनीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल केला.
त्या दिवशी नेमके काय घडले?
तीन तारखेला पीडित विद्यार्थिनी मराठीचा पेपर देऊन संध्याकाळी साडे चारच्या सुमारास घरी आली. त्या वेळी तिची आई कपड्यांना इस्त्री करत होती. मुलीचे डोळे रडल्याप्रमाणे लाल दिसत असल्याने तिच्या आईने याबाबत विचारणा केली. मात्र आपण मोबाईल पाहण्यात गर्क असल्याचे दाखवत तिने वेळ मारून नेली. काही वेळाने ती वरच्या माळ्यावर तिच्या खोलीत गेली. बराच
वेळ झाला ती खाली न आल्याने तिला तिच्या काकूने आणि एका मैत्रिणीने जोरात आवाज दिला. मात्र, प्रतिसाद आला नाही. शेवटी तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला तरीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता मुलीने बेडशीटच्या साहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले होते.
पीडित विद्यार्थिनीला कॉपी करताना पकडण्यात आले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका देशमुख यांनी 'तुम्ही झोपडपट्टीवाले कधी सुधारणार नाहीत, तुमची लायकी नाही या शाळेत शिकायची', असा सर्व विद्यार्थ्यांसमोर पाणउतारा केला. त्यामुळे माझ्या मुलीने घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार मृत विद्यार्थिनीच्या आईने देशमुख यांच्याविरोधात पोलिसांत दिली.