

नवी मुंबई : मागील महिनाभरापासून नवी मुंबईत संततधार पावसाने हजेरी लावली आहे. गणेशोत्सवापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने नवी मुंबईतील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यामुळे पावसातच गणेशोत्सवात नवी मुंबई महापालिकेन खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. गणेशोत्सवात सुरू असणार्या पावसाने नवी मुंबईतील रस्त्यांची पुन्हा चाळण करण्यास सुरुवात केली आहे.
रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांचा फटका वाहनांना बसत आहे. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्यात वाहने आपटून लहानमोठे अपघातही होत आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून या खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी केली जात आहे. परंतु तीही तात्पुरत्या स्वरुपाची ठरल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाने लवकर हजेरी लावली आहे. संततधार कोसळणार्या पावसामुळे सायबर सिटीच्या अनेक भागांतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याचा सर्वाधिक फटका वसाहती अंतर्गतच्या छोट्या रस्त्यांना बसला आहे. ठाणे -बेलापूर मार्गावरील पदपथाच्या बाजूच्या असणार्या डांबरी पट्ट्यांना खड्डे पडले आहेत.
तुर्भे उड्डाणपुलाखाली खड्डे पडलेले आहे. ऐरोली, रबाले, घणसोली, कोपरखैरणे येथील अंतर्गत रस्ते पावसाने वाहून गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तुर्भे, सानपाडा,जुईनगर, नेरुळ, सीबीडी बेलापूर भागांतील रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत.रस्त्यांना पडलेले खड्डे खडी, वाळूचा भरावा टाकून बुजविण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येत आहे. परंतु हे प्रयत्नही तकलादू ठरल्याचे दिसून येत आहे.
नागरी वसाहतीसह एमआयडीसीच्या औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचीही पावसाने वाट लावली आहे. रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांत पावसाचे पाणी साचून ठिकठिकाणी डबकी तयार झाली आहेत. अशातून मार्ग काढताना मालवाहू अवजड वाहनांची चांगलीच कसरत होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करून रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवी मुंबईत यंदा पावसाने रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे किरकोळ अपघात होत आहेत. गणेशोत्सवापूर्वी महापालिकेने खड्डे बुजवले होते. पण आता पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे.
अरुण साळुंखे, वाहनचालक
रस्त्यांना पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवण्यात आले होते. आता पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडले असल्यास पाहणी करून ते बुजवण्यात येतील.
शिरीष आरदवाड, शहर अभियंता नमुंमपा