

नवी मुंबई : राजेंद्र पाटील
ठाणे, नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा संघर्ष वाढत असतानाच नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेली चौदा गावे यांनी नाईक यांच्याकडे पाठ फिरवत भाजपच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
चौदा गावे सर्वपक्षीय विकास समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही सर्व गावे आगामी महापालिका निवडणुकीत मंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात जाण्याची शक्यता आहे राज्य सरकारने चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश केला. एकीकडे त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले असतानाच गेल्या आठवड्यात भाजपचे मंत्री असलेले गणेश नाईक यांनी ही समाविष्ट केलेली गावे निवडणुकीनंतर सहा महिन्यांत वगळण्यात येतील असे जाहीर करून टाकले. भाजपच्या ज्येष्ठ आमदार मंदा म्हात्रे यांनी या गावाच्या नवी मुंबईतील समावेशाला जाहीर पाठिंबा दिला. परिणामी, या १४ गावांतून मंत्री नाईक आऊट तर आमदार मंदा म्हात्रे इन झाल्याची चर्चा रंगली आहे.
चौदा गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या शिष्टमंडळाच्या गावांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार मंदा म्हात्रे यांना निवेदन दिले. पायाभूत सुविधा विकास, रस्ते व पाणीपुरवठा व्यवस्था, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील सुधारणांची गरज तसेच कर व प्रशासकीय सुविधांचे प्रश्न त्यात मांडले आहेत. आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, "राज्य शासनाचा हा निर्णय स्थानिकांच्या दीर्घकालीन मागणीचा सकारात्मक निकाल आहे. चौदा गावांचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांच्या वृद्धीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन."