

नवी मुंबई: नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी, २२ ऑगस्ट रोजी पर्दाफाश केला आहे. महापे येथील मे. पी. के. डेअरीवर दुधाची पाकिटे फोडून त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि चिलरच्या थंड पाण्याचे मिश्रण टँकरमध्ये ओतत असताना रंगेहाथ पकडला गेला.
याप्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पेढ्यांचे अन्न परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि नष्ट करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार, दक्षता विभागाच्या सह-आयुक्त श्रीमती प्रीती टिपरे आणि ठाण्याचे अन्न सह-आयुक्त सचिन जाधव यांच्या निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. १९ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे एफडीएच्या पथकाने महापे येथील मे. पी. के. डेअरीवर अचानक छापा टाकला.
गुन्ह्यामध्ये १५ व्यक्तींचा सहभाग
या गुन्ह्यामध्ये ठाणे, दिघा, ऐरोली, घणसोली येथील शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल, प्रदीप कमलेश यादव, भास्कर संतु पिलानी यांच्यासह मे. महाराज डेअरी (ऐरोली), मे. विजय डेअरी (घणसोली), मे. शिवकैलास डेअरी (ऐरोली), मे. रूपसागर डेअरी (ऐरोली), मे. दिनेश डेअरी (ऐरोली), मे. बालाजी डेअरी (ऐरोली), मे. शुक्लम् डेअरी (दिघा), मे. श्रीराम डेअरी (कोपरी, ठाणे), मे. वासुदेव डेअरी (कोपरी, ठाणे), मे. राधाकृष्ण डेअरी (कोपरी, ठाणे), मे. जनम डेअरी (साकेत, ठाणे) आणि मे. देवनारायण डेअरी (आझाद नगर, ब्रह्मांड, ठाणे) याचा समावेश आहे.
भेसळीची धक्कादायक पद्धत
छाप्यादरम्यान मे. पी. के. डेअरीच्या आवारात 'एमएच ०४ केयू १६३४' क्रमांकाचा आयशर दूध टँकर उभा असल्याचे आढळले. डेअरी मालक प्रदीप कमलेश यादव याच्या संगनमताने शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल (वय ३४) हा दुधाची पाकिटे फोडून त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि चिलरच्या थंड पाण्याचे मिश्रण टँकरमध्ये ओतताना रंगेहात पकडला गेला.
१ किलो स्किम मिल्क पावडरमध्ये ८ ते १० लिटर थंड पाणी मिसळून ते प्लंजरच्या साहाय्याने एकजीव केले जात होते. हे भेसळयुक्त दूध गायी-म्हशीचे शुद्ध दूध असल्याचे भासवून ठाणे, ऐरोली, कोपरी, दिघा आणि घणसोली परिसरातील अनेक डेअऱ्यांना पुरवले जात होते.
कारवाईत कंपन्यांचे परवाने जप्त
अन्न सुरक्षा परवाना नसल्यामुळे मे. पी. के. डेअरीचा व्यवसाय बंद केला. या मोहिमेदरम्यान डेअऱ्यांमधून ४,७१० लिटर भेसळयुक्त व संशयित दूध (किंमत १,८५,७८०/-) जप्त करून नष्ट करण्यात आले.
याशिवाय १२९.५ किलो पनीर (किंमत ४५,२८०/-), ४७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर (किंमत १,६०,८२०/-) आणि ८८.४ किलो क्रीम (किंमत ३०,९४०/-) असा साठा जप्त करण्यात आला. तपासणी दरम्यान डेअरीतून ३९३ लिटर म्हशीचे आणि ३६८ लिटर गायीचे असे एकूण ७६१ लिटर दूध (किंमत ४०,५५८/-) जागेवरच नष्ट केले गेले.
मे. भास्कर डेअरी (महापे) येथून ५४८ किलो संशयित पावडर व पनीर (किंमत १,८३,३२०/-) जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला. मे. नारायण डेअरी (रबाळे) कडील प्रयोगशाळा अहवाल नसलेला ३,६४८ लिटर पाश्चराईज्ड स्किम्ड दुधाचा साठा (किंमत १,२४,०३२/-) नष्ट करण्यात आला. मे. फत्तेसिंगराव नाईक सहकारी दूध संघाकडून ८८.४ किलो क्रीम जप्त करण्यात आले.