

मुंबई: नवी मुंबईतील प्रस्तावित पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्रे प्रदान करतानाच याशिवाय आणखी पाच नवीन आंतरराष्ट्रीय विद्यापीठे महाराष्ट्रात येत असून ती नवी मुंबईशिवाय अन्य शहरांत सुरू होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे जाहीर केले.
हॉटेल ताज येथे ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या कार्यक्रमात पाच जागतिक विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्यासाठीचे (एलओआय) आशयपत्र प्रदान केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब नवी मुंबईत उभारण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात 250 एकरात ही विद्यापीठे उभी राहतील. याच परिसरात येत्या काही वर्षात सिडकोकडून मेडिसिटी, स्पोर्टस सिटी आणि इनोव्हेशन सिटी देखील उभारण्यात येणार आहे. राज्यातील इतर शहरांमध्येही आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार आहेत. भविष्यात अजूनही विद्यापीठांचे स्वागत करायला आम्ही तयार आहोत. नुकताच वेस्टर्न युनर्व्हसिटी आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज राहणार नाही. उलट विदेशी शिक्षणासाठी येणार्या एकूण खर्चात प्रत्येक विद्यार्थ्याची किमान 25 टक्के बचत होईल आणि देशाचेही मोठ्या प्रमाणात परकीय चलनही वाचणार आहे.
राज्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येतील, असे आपण 2004 पासून ऐकत होतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परदेशी शिक्षणासाठी भारताची दारे खुली झाली आहेत. विकसित भारत 2047 मध्ये हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, मुंबई ही स्वप्नांची नगरी आणि आर्थिक राजधानी देखील आहे. आगामी कालावधीत मुंबई येथे शिक्षणाचे हब होण्यासाठी परदेशी पाच विद्यापीठांचे खूप महत्त्वाचे योगदान राहील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक पातळीवरच्या विद्यापीठांना देखील आपल्या संस्था भारतात आणि भारतातील शिक्षण संस्थांना परदेशामध्ये आपल्या शाखा उघडता येतील. सध्या भारतातील आयआयटी, आयआयएम, आयएफ, सिम्बॉयसिस यासारख्या संस्था परदेशामध्ये सुरू झाल्या आहेत.
पाच विदेशी विद्यापीठांना आशय पत्र प्रदान करण्याच्या सोहळ्यात अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी,अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी,अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हँकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा, अॅबर्डीन विद्यापीठाचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्रा.सिलादित्य भट्टाचार्य, यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ उपकुलगुरू गॉय लिटलफेअर, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज ईचंबाडी, आयईडी चे रिकार्डो बाल्बो, अधिष्ठाता, विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
युनिव्हर्सिटी ऑफ बर्डीन (स्कॉटलंड, यु.के.),
युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यु.के.)
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया)
इलीनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका),
इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली).
ही विद्यापीठे मुंबई,नवी मुंबईत पूर्ण कॅम्पस आणणार आहेत.
नवी मुंबईतील या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर शिक्षण आणि संशोधनसाठी ओळखला जाईल. मुंबईची सध्या वित्तीय, औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे. आता या विद्यापीठांमुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, इतर पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी या गोष्टी विद्यापीठांसाठी फायद्याच्या ठरतील.