नवी मुंबई, पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी आज (दि. ११) सकाळी करण्यात आली. त्यानंतर भारतीय हवाईदलाचे 'सी 295' विमान विमानतळावर लँडिंग करण्यात आले. यावेळी सीएम शिंदे यांनीही विमानातून उड्डाण केले.
भारतीय हवाईदलाच्या ‘सी 295’ विमानाने अवकाशात ७ ते ८ घिरट्या घातल्यानंतर धावपट्टीवर लँण्डींग करण्यात आले. यावेळी विमानाला ‘वॉटर सॅल्यूट’ देण्यात आला. ‘सी 295’ विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर उतरविण्यात आले.
दरम्यान, या विमानतळावरुन मार्च २०२५ मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानसेवा जून २०२५ पासून सुरु करण्यात येईल, असे सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सांगितले.
विमानतळावर २ धावपट्टी तयार केल्या आहेत. ४ टर्मिनलवर ३५० विमानांचे एकाच वेळी पार्किंग करण्याची सोय करण्यात आली आहे. विमानतळावर मेट्रो आणि बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. सिडकोकडून या विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. 4 टर्मिनल बिल्डिंगमधून कोठूनही चेक इन केले तरी प्रवाशांना त्यांच्या फ्लाईटपर्यंत जाता येणार आहे.