मुंबई ः विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीची साथ सोडून, महायुतीसोबत हातमिळवणी करू शकतात, असा खळबळजनक दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी केला.
शरद पवार हे त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी आणि राज्याच्या हिताच्या निर्णयासाठी कोणत्याही क्षणी महायुतीला पाठिंबा देतील, असे मला वाटते, असेही राणे यांनी म्हटले आहे. शरद पवार हे उद्धव ठाकरे किंवा काँग्रेससोबत राहणार नाहीत. ते महायुतीसोबत हातमिळवणी करतील, असा दावा राणे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात तो चर्चेचा विषय बनला आहे. शरद पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळू शकते. त्यामुळे यापुढील घटनांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राणे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली असून, शिवसेनेचे पूर्वीसारखे वर्चस्व राहिलेले नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले होते. निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रस्त्याने चालणेसुद्धा कठीण होईल, अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.