

मुंबई: मुंबईसह राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचे गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पडसाद उमटले. या हनी ट्रॅपच्या कथित पुराव्यांचा पेनड्राईव्हच काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत आणला.
मंत्रालय, नाशिक आणि ठाण्यातील या हनी ट्रॅपमुळे गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्त्वांच्या हाती पोहोचत असून त्याचे पुरावे पेनड्राईव्हमध्ये असल्याचा दावा पटोले यांनी केला, तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हनी ट्रॅपमुळे राज्याची प्रशासकीय स्तरावरील गुप्त माहिती व महत्त्वाच्या फाईल बाहेर गेल्याचा आरोप विधान परिषदेत केला.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, या हनी ट्रॅपमुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात असून राज्याची प्रतिमा मलिन होते आहे. सरकार यावर साधे निवेदन द्यायलासुद्धा तयार नाही, हे धक्कादायक असल्याचे पटोले म्हणाले. हनी ट्रॅपसारख्या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव या सगळ्यामुळे राज्यात नेमके काय चालले आहे?असा प्रश्न निर्माण होतो. राज्याच्या सुरक्षेचे प्रश्न असोत किंवा गरिबांचे जीवनमान, सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत, असेही पटोले विधानसभेत म्हणाले.
विधान परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, राज्यातील राजकीय नेते व काही वरिष्ठ स्तरावरील अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. राज्याची प्रशासकीय स्तरावरील गुप्त माहिती व महत्त्वाच्या फाईल बाहेर गेल्याची माहिती आहे, असे दानवे म्हणाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी सरकारला अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व निवेदने करण्याचे निर्देश दिले.