

मुंबई : पुढारी वृत्तसेवा नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या सहयोगी प्राध्यापकाला प्रशासनाने निलंबित केले असून या प्रकरणाची चौकशी महापालिका मुख्यालय स्तरावरील सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र मुख्य अंतर्गत तक्रार समितीकडे सोपविण्यात आली आहे. या समितीकडून चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
नायर रुग्णालयात वैद्यकीय महिला डॉक्टरचा सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी महिलांवरील लैंगिक अत्याचारविरोधी असलेल्या मुख्य अंतर्गत तक्रार समितीकडे विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनंतर केलेल्या तपासणीत तथ्य आढळून आले आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचारविरोधी समितीने सहयोगी प्राध्यापकासह अन्य एका डॉक्टरवर आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली होती.
ही विद्यार्थिनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. लैंगिक अत्याचारविरोधी समितीकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पीडित विद्यार्थिनी मार्चमध्ये औषधनिर्माण शास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापकाला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्यांनी तिला आपल्या खोलीमध्ये बोलावून तिच्या खेळाबाबत प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी शनिवारी दुपारी पुन्हा तिला आपल्या केबिनमध्ये बोलवले. यावेळी संबंधित प्राध्यापकाने तपासणीचे निमित्त करून विनयभंग केल्याचे पीडित विद्यार्थिनीने तक्रारीमध्ये म्हटले आहे. प्राध्यापकाच्या या अश्लील कृत्याची माहिती तिने आपल्या मित्रांना दिली तसेच याची तक्रार मुख्य अंतर्गत तक्रार समितीकडे केली. या समितीने केलेल्या तपासणीनंतर विद्यार्थिनीच्या म्हणण्यात तथ्य आढळून आल्याने संबंधित प्राध्यापकावर कारवाई करत त्यांची बदली करण्याची शिफारस करण्यात आली होती.
लैंगिक छळ तक्रार प्रकरणात अतिरिक्त तक्रारी प्राप्त झाल्या असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी ही महापालिका मुख्यालय स्तरावरील 'कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती' यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या घटनेची आणि तक्रारीची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीमध्ये आढळलेले प्राथमिक तथ्य आणि घडल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता, या तक्रारीनुसार आरोपी असलेल्या सहयोगी प्राध्यापकाचे प्रशासनाने निलंबन केले आहे. था. व. ल. नावर धर्मा, सम्सय मुख्यालय स्तरावरील चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.