

कांदिवली : मालाड पी/उत्तर महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शांताराम तलावाच्या वर केलेल्या सुशोभीकरणाची दुरावस्था झाली आहे. या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या निधीतून करण्यात आले होते. परंतु या तलावाच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या या तलावाची दुरावस्था झालेली दिसून येत आहे त्यामुळे या तलावाच्या बाजूला स्थानिक नागरिक, महिला तसेच लहान मुलांना खेळण्यास अडचण होत आहे.
या तलावाच्या काठावर गोल लावलेल्या फरश्या उखडलेल्या तसेच तुटलेल्या आहेत. नागरिकांना बसण्यासाठी लावलेल्या बेंचवर प्रेमीयुगूल अश्लील चाळे करण्यात दंग असते. जॉगिंग ट्रॅकच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तलावाच्या सुशोभीकरणासाठी लावलेला कारंजा बंद असल्याने त्याला गंज चढला आहे. तलावाच्या पाण्यात कचरा साचला आहे. वेळ-वेळी घाण पाणी स्वच्छ केले जात नसल्याने तलावाच्या पाण्यातून दुर्गंधी येत आहे. सायंकाळी या मैदानात दारुड्यांचा अड्डा बसतो. या तलावात मासे असल्यामुळे काही लोक त्यांना बाहेरील अन्न आणून टाकत असतात. कबुतरे, उंदिर, मुंग्यांसाठी जागोजागी साखर, पीठ, पोहे, शिल्लक अन्न, मळलेल्या ओल्या पिठाचे गोळे नागरिक ठेवत असतात. यामुळे उंदरांची संख्या वाढली असून सुशोभीकरणाला पूर्ण पोखरून ठेवले आहे. सुरक्षा रक्षक असूनही सकाळपासून दारू व नशा करणारे तरुण या ठिकाणी बसलेले असतात. याचा वरिष्ठ नागरिक व महिलांना एका ठिकाणी बसून व्यायाम, योग करताना अडथळा होत आहे. याबाबत रहिवाशांच्या वारंवार तक्रारी असूनही महापालिका प्रशासनाने या तलावाकडे डोळेझाक केली आहे. याशिवाय लहान मुलांना मैदानातील खेळण्याचा आनंद मिळत नसल्याने स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
मालाड पालिका पी/उत्तर विभागाने या मैदानावर जॉगिंग ट्रॅक, खेळणी व व्यायामाच्या साहित्याची सोय उपलब्ध करून दिल्यास नागरिक व खेळण्यासाठी येणाऱ्या मुलांना मैदानाचा वापर करता येईल. यामुळे कांदिवली पालिका विभागाने याकडे दुर्लक्ष न करता या मैदानाचे नूतनीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी स्थानिक नागरिक तसेच महिला वर्गातून केली जात आहे.