Mumbai Dabbawala: मुंबईकरांनो लक्ष द्या! पावसामुळे आज डबेवाल्यांची सेवा बंद; सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय

Mumbai Dabbawala Service: मुंबईतील मुसळधार पाऊस आणि रेल्वे वाहतुकीतील अडथळ्यांमुळे जगप्रसिद्ध डबेवाल्यांनी आजची सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Dabbawala Service
Mumbai Dabbawala ServicePudhari
Published on
Updated on

Mumbai Dabbawala Service: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचा फटका आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही बसला आहे. सततचा पाऊस आणि रेल्वे वाहतुकीतील अडथळे लक्षात घेऊन मुंबई डबेवाला संघटनेने सोमवारी एक दिवसासाठी डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले की, विरार-वसई परिसरात राहणाऱ्या अनेक डबेवाल्यांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तसेच अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

याच पार्श्वभूमीवर डबेवाल्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आजची सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांची गैरसोय झाल्याबद्दल संघटनेने दिलगिरीही व्यक्त केली आहे.

रेल्वे विस्कळीत झाल्याचा थेट परिणाम

मुंबईतील डबेवाले दररोज हजारो घरगुती जेवणाचे डबे शहराच्या विविध भागांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रामुख्याने मुंबईच्या रेल्वेवर अवलंबून असतात. मात्र मुसळधार पावसामुळे विशेषतः पश्चिम रेल्वेवरील अनेक लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने डबे वेळेत पोहोचवणे अशक्य झाले.

125 वर्षांच्या परंपरेला तात्पुरता ब्रेक

मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा जगभरात त्यांच्या अचूक आणि वेळेवर होणाऱ्या डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या 125 वर्षांहून अधिक काळात पूर, संप आणि अनेक संकटांचा सामना करत ही सेवा सुरू राहिली. मात्र यावेळी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डबेवाल्यांची कार्यपद्धती ही जगातील अनेक व्यवस्थापन संस्थांमध्ये अभ्यासाचा विषय मानली जाते. हजारो डबे जवळपास शंभर टक्के अचूकतेने पोहोचवण्याची त्यांची प्रणाली ही जगातील सर्वात कार्यक्षम पुरवठा साखळींपैकी एक मानली जाते.

Mumbai Dabbawala Service
Mumbai Red Alert: मुंबईत रेड अलर्ट! खासगी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम', शासकीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी

मुंबईत रेड अलर्ट कायम

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत अतिमुसळधार पाऊस आणि ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून सखल भाग, समुद्रकिनारे आणि झाडांच्या परिसरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महापालिकेने सुमारे 15 हजार कर्मचारी तैनात केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news