Mumbai Well Water Restrictions: विहिरींतील पाणी उपशावर येणार निर्बंध! पाणी वापरासाठी पालिकेची परवानगी होणार बंधनकारक

सात तलावांतील पाणीसाठा घटल्याने महापालिकेची तयारी; खासगी विहिरींचे सर्वेक्षण करून टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरही नियंत्रण आणण्याचा विचार
Mumbai Well Water Restrictions
Mumbai Well Water RestrictionsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका विहिरींतील पाणी उपशावर काही निर्बंध लादणार आहे. विशेष म्हणजे, विहिरींतील पाणी वापरासाठी महापालिकेची परवानगी बंधनकारक करण्याचा विचार असल्यामुळे राजरोसपणे विहिरींतील लाखो लिटर पाण्याचा उपसा थांबणार असून, बांधकामासाठी पाणी अपुरे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत दीड लाख दशलक्ष लिटरने कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेने १० टक्के पाणी कपात ‘जैसे थे’ ठेवली आहे.

तरीही उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईची झळ पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे कपातीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने काही उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Well Water Restrictions
Mumbai Temperature Drop: मुंबईत थंडीची चाहूल; किमान तापमान १६.२ अंशांवर, हंगामातील नीचांकी नोंद

यात मुंबईतील विहिरींची साफसफाई करून त्यातील पाण्याच्या उपशावर निर्बंध लादण्यात येणार आहे. सध्या विहिरींच्या पाण्याचा वापर इमारतींच्या बांधकामांसह अन्य बांधकामांसाठी वापरण्यात येतो, तर काही हॉटेलचालकही पिण्याव्यतिरिक्त कामासाठी विहिरींचे पाणी वापरत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विहिरींच्या पाण्याची मागणी आहे.

मुंबई शहर व उपनगरात पूर्वी सुमारे २५ ते ३० हजार विहिरी होत्या; परंतु मुंबईतील विकासकामांमुळे अनेक विहिरी बुजल्या गेल्या. त्यामुळे मुंबई महापालिकेकडे असलेल्या नोंदणीनुसार, सध्या जेमतेम १२ विहिरी शिल्लक आहेत.

दक्षिण व मध्य मुंबईमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त विहिरी असून, पश्चिम व पूर्व उपनगरात याच विहिरींची संख्या सुमारे ७ हजारांच्या घरात आहे. या सर्व विहिरी खासगी मालकीच्या असल्यामुळे त्यातील पाण्याच्या उपशावर पालिकेचे नियंत्रण नाही. त्यामुळे या विहिरींतून लाखो लिटर पाणी बांधकामासाठी टँकरद्वारे पुरवठा केले जाते.

यातून विहीरमालकाला प्रतिटँकर २०० ते ३०० रुपये, तर काही मालकांना ४०० ते ५०० मिळतात, तर टँकरवाले १० ते १२ हजार लिटरचा प्रतिटँकर १,२०० ते १,३०० रुपयांना विकतात. परंतु, आता यावर निर्बंध येणार असल्यामुळे मालकांसह टँकर लॉबीला मनमानीप्रमाणे पाण्याचा उपसा करता येणार नाही.

Mumbai Well Water Restrictions
Smart Anganwadi Facilities: राज्यातील ३ हजार ८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’; अदिती तटकरे यांची माहिती

विहिरींचे पाणी आटतेय

दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात चाळी व जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू असल्यामुळे खोदकामांमध्ये अनेक विहिरी काढल्या जात असून, काही विहिरींचे पाणी आटत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या. याबाबत महापालिका सभागृहातही चर्चा झाली होती. यावेळी प्रशासनाच्या वतीने विहिरी वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते.

मुंबईतील विहिरींना विशेष महत्त्व

मुंबईत नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला नव्हता. त्या काळात स्थानिक नागरिक, व्यापारी आणि ब्रिटिश अधिकारी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींवरच अवलंबून होते. गिरगाव, भुलेश्वर, काळबादेवी, वांद्रे, माहीम, आणि वरळी या जुन्या भागांत शेकडो विहिरी खोदण्यात आल्या होत्या. यातील अनेक विहिरींना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले.

वाळकेश्वर येथील ‘बाणगंगा’ तलाव आणि त्याच्या आसपासच्या विहिरी आजही प्रसिद्ध आहेत. अनेक विहिरींची बांधणी काळ्या दगडात अतिशय कलात्मक पद्धतीने केलेली आढळते. विहिरींतील पाणी उन्हाळ्यात तळ गाठत असल्यामुळे महापालिकेने भूजलाची पातळी वाढवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

विहिरींच्या पाण्याचा होतोय यासाठी वापर

  • बागकाम आणि झाडांना पाणी घालणे

  • बांधकाम आणि गाड्या धुणे

  • सोसायट्यांमध्ये स्वच्छता, अन्य घरगुती व हॉटेल वापर

निर्बंध लादण्यासाठी पालिका करणार अभ्यास

  • एका विहिरीतून किती लिटर पाण्याचा उपसा

  • पूर्वी विहिरींची असलेली खोली व आताची खोली

  • इमारतीच्या बांधकामामुळे पाण्याची पातळी खालावली का?

  • एका विहिरीवर किती टँकर भरावेत?

  • बुजलेल्या विहिरी उपसणे

  • सर्व उपनगरातील विहिरींचा सर्व्‍हे करून अधिकृत संख्या जाहीर करणार