

मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळीची वाढ मंदावली आहे. गेल्या दोन दिवसात म्हणजेच ४८ तासांमध्ये पाणी साठ्यात अवघी ०.१० टक्केने वाढ झाली आहे. त्यामुळे अजून काही दिवस मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहेत.
तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात झपाट्याने वाढ झाली. ६ टक्के पर्यंत खाली पोचलेला पाणीसाठा सुमारे ४९.९३ टक्के इतका झाला आहे. पूर्णपणे आटलेले तानसा व अपर वैतरणा तलावातही आता ७८ ते २८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातही सुमारे ४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. पण गेल्या तीन चार दिवसापासून तलाव क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे पाणीसाठ्याची वाढ खुंटली आहे.
सात तलावांमध्ये शनिवार ११ जुलैला ७ लाख २१ हजार २७८ दशलक्ष लिटर म्हणजे ४९.८३ टक्के पाणीसाठा होता. सोमवार १३ जुलै म्हणजे गेल्या ४८ तासांमध्ये पाणीसाठा ७ लाख २२ हजार ६४९ दशलक्ष लिटरपर्यंत पोहचला.
म्हणजेच दोन दिवसांमध्ये १ हजार ३७१ दशलक्ष लिटर इतकी वाढ झाली. त्यामुळे पाणी टंचाई टाळण्यासाठी आता तलाव क्षेत्रात मोठ्या पावसाची गरज आहे. मुंबईतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अजून ५० टक्के म्हणजे सात लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
यासाठी किमान तलाव क्षेत्रांमध्ये १५०० मीमी ते १७०० मीमी पावसाची गरज असल्याचे एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.