

BMC Draft Plan
मुंबई : मुंबई शहर व उपनगरांतील 227 प्रभागांच्या पुनर्रचनेचे काम जवळपास संपले आहे. या प्रभाग पुनर्रचनेत फारसा फरक नसून काही प्रभागांच्या हद्दी बदलल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. पण प्रत्येक प्रभागात मतदारांची संख्या समान ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान प्रभाग पुनर्रचनेचा प्रारूप आराखडा आता नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला असून त्यानंतर हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना करण्याचा अधिकार मुंबई महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील 227 प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली असून प्रत्येक प्रभागाची हद्द निश्चित करण्यात आली आहे. हद्द निश्चित करताना प्रत्येक प्रभागात सरासरी मतदारांची संख्या एकच असावी, हे कटाक्षाने बघण्यात आले आहे. ज्या प्रभागांच्या जुन्या हद्दीत लगतच्या प्रभागातील मतदार संख्येपेक्षा कमी मतदारसंघ होती, अशा प्रभागांची हद्द बदलून समान मतदारसंघ करण्यात आल्याचे एका अधिकार्याने सांगितले.
या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्याचा अभ्यास करून, राज्य निवडणुक आयोग व आयोगाने प्राधिकृत केलेला अधिकारी प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता देणार आहे. यासाठी 23 ते 28 ऑगस्ट वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर मुंबईकरांच्या हरकती सूचना मागवण्यात येणार असून यासाठी 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर मुंबईकरांकडून आलेल्या हरकती सूचनांवर 9 ते 15 सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आराखडा तयार करून तो राज्याच्या नगर विकास विभागाला सादर करण्यात येणार आहे.
सप्टेेंबरअखेर राज्य सरकारकडून अंतिम आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम केलेला प्रारूप आराखडा निवडणूक आयोगामार्फत प्रसिद्ध केला जाणार आहे.