मुंबई : मुंबई विद्यापीठाची सर्वसाधारण अधिसभा (सिनेट) येत्या रविवारी (27 जुलै) आयोजित करण्यात आली असून, ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि विशेषतः परीक्षा विभागातील गोंधळावर युवासेनेचे पदवीधर सिनेट सदस्य आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने नियोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावरही युवासेना सदस्यांनी बहिष्कार टाकला असून, त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि युवासेनेतील मतभेद अधिकच चिघळल्याचे चित्र आहे.
परीक्षा विभागाच्या कारभारावर वारंवार टीका करूनही अद्याप कोणताही ठोस बदल न झाल्याने युवासेना सदस्य संतप्त आहेत. यापूर्वी अनेकदा पेपर तपासणीत त्रुटी, तसेच उत्तरपत्रिका मधील गुण कमी देण्याच्या तक्रारी सभेत मांडल्या होत्या. मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून या बाबींवर फक्त आश्वासने दिली जात असून, प्रत्यक्षात सुधारणा होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परीक्षा विभागाच्या पेपर तपासणीसंदर्भातील नियमात अनेक बदल केले आहेत. हे संशास्पद आहेत असा आरोपही सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला आहे.
रविवारी होणारी ही बैठक, युवासेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे व विद्यापीठ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संघर्षपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थीहिताच्या मुद्यांवर स्पष्ट जाब विचारण्याचा निर्धार युवासेनेने दर्शवला आहे. त्यामुळे अधिसभेतील चर्चा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून विविध महाविद्यालयांतील प्रश्नांबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून आश्वासने दिली जात आहेत, परंतु अंमलबजावणीचा अभाव कायम आहे. ही दुटप्पी भूमिका निषेधार्ह असल्याचे मत ‘बुक्टू’ या प्राध्यापक सिनेट सदस्यांनी व्यक्त केले.
ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून, अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळत असल्याच्या तक्रारी सतत येत आहेत. यामुळे परीक्षा विभागाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करुनही अनेक विद्यार्थ्यांना त्याच्या निकालाबाबतही विश्वासर्हता नाही.