

Mumbai Metro Ticketing
मुंबई : मुंबईच्या कोणत्याही भागातून देशभरात कोठेही प्रवास करत असताना वेगवेगळी तिकिटे काढण्याची गरज यापुढे भासणार नाही. मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या एकात्मिक तिकीट प्रणाली म्हणजेच एनसीएमसी कार्डचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांच्या सहकार्याने या कार्डची निर्मिती करण्यात आली आहे. या नवीन सुविधेमुळे आता प्रवासी आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक दरम्यान एनसीएमसी कार्ड वापरून सहज व संपर्करहित प्रवास करू शकतील. यामुळे तिकीट खिडकीवरील रांगा टाळता येतील आणि प्रवास अधिक जलद होऊ शकेल.
हे एनसीएमसी कार्ड मेट्रो मार्ग 3 सोबतच मार्ग 2अ , 7 आणि मेट्रो 1 वर देखील वापरता येईल. त्यामुळे एकसंध व सोयीस्कर प्रवास करता येईल. इतर मेट्रो मार्ग व ‘चलो बस’सारख्या ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्सने उपलब्ध करून दिलेले एनसीएमसी कार्ड्सदेखील मेट्रो मार्ग 3 वर वापरता येतील. प्रवाशांना 11 जून 2025 पासून सकाळी 11 वाजल्यापासून ही सेवा उपलब्ध होईल.
नवीन एनसीएमसी कार्ड आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक दरम्यान कोणत्याही स्थानकावर उपलब्ध आहे व एसबीआयच्या सहभागी शाखांमधून कार्ड मिळेल. हे कार्ड मोफत दिले जात आहे; मात्र वापरासाठी 100 ते 2 हजार रुपयांपर्यंत रक्कम त्यात भरणे अनिवार्य आहे.
भुयारी मेट्रो मार्गिकेवर सुरू झालेल्या एकात्मिक तिकीट प्रणाली म्हणजेच एनसीएमसी कार्डला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता या कार्डची सेवा सुरू झाल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत 615 प्रवाशांनी हे कार्ड घेतले. कार्ड घेतलेल्या प्रवाशांपैकी 596 जणांनी प्रत्यक्ष प्रवासही केला. कार्डच्या विक्रीतून 2 लाख 17 हजार 200 रुपये उत्पन्न मेट्रोला मिळाले.
एनसीएमसी कार्ड हे इतर वाहतूक सुविधा जसे की बेस्ट बसेस तसेच विविध मेट्रो मार्ग यांच्या एकत्रिकरणाच्या दृष्टीने व सावर्जनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्याचा दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. एनपीसीआय व एसबीआय यांच्या सहकार्याने आम्ही मुंबईकरांसाठी एक सुलभ आणि एकत्रित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन