

मुंबई : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या लोकल रेल्वे मार्गालगत असलेली जमीन देशातील सर्वांत महागडी म्हणून गणली जाते. या रेल्वेमार्गाच्या एका बाजूला मरिन ड्राईव्ह आणि कोस्टल रोड, तर दुसऱ्या बाजूला महर्षी कर्वे रोड आहे. या दोन्ही रस्त्यांच्या मध्ये असलेला रेल्वेमार्ग सलग मार्गाला एक प्रकारचा अडथळाच आहे.
हा अडथळा दूर केला तर दोन्ही मार्ग जोडून या ठिकाणी पार्किंग तसेच व्यावसायिक संकुल उभारले जाऊ शकते. अशीच स्थिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ या मार्गावर आहे. हे लोकल मार्ग भुयारी केले तर जमीन सलगपणे उपलब्ध होऊ शकते. त्यादृष्टीने रेल्वेने अभ्यास सुरू केला आहे.
या दोन्ही ठिकाणी भुयारी रेल्वे उभारण्याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भुयारी रेल्वेमार्ग तयार करणे अभियांत्रिकीच्या दृष्टीने गुंतागुंतीचे तसेच प्रचंड मोठ्या खर्चाचे ठरू शकते. बोगदे तयार करणे, त्यात पुरेशी हवा खेळती ठेवण्याच्या दृष्टीने व्यवस्था तयार करणे, अशी आव्हाने आहेत. अर्थात नवीन तंत्रज्ञान आणि भुयारी मार्ग उभारणारे अभियंते यांनी मनावर घेतले तर हा प्रयत्न सफल होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान असलेला रेल्वेमार्ग १०० वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. ही रचना बदलायची असेल तर दक्षिण मुंबईचा त्या भागातील आराखडा पुढील १०० वर्षे लक्षात ठेवून तयार करावा लागेल.
त्यादृष्टीने रेल्वेने अभ्यास सुरू केला आहे. या अभ्यासामध्ये आर्थिक आणि तांत्रिक दोन्ही शक्यता पडताळण्यात येणार आहेत. त्यानंतर रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य सरकार या दोघांना मिळून हा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. चर्चगेट ते मुंबई सेंट्रलप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ या दरम्यानचाही अभ्यास सुरू आहे. सध्या या मार्गावरील पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका रखडलेली आहे. नव्या भुयारी प्रकल्पामध्ये या दोन्ही मार्गिका पूर्ण होऊ शकतात, असेही रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जमिनीवरील परिणाम : 40 एकर जमीन मोकळी होऊ शकते
संभाव्य वापर
सध्या असलेले रस्ते रुंद करणे
जोडरस्ते विकसित करणे
मर्यादित व्यावसायिक विकास
नागरी सुविधा वाढवणे
कालावधी आणि अभ्यास : अभ्यासाचा कालावधी ६ महिने
अभ्यास पूर्ण झाल्यानंतर केंद्र आणि राज्याकडून निर्णय अपेक्षित
तांत्रिक आव्हाने : पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर ४ रेल्वेमार्गिका आहेत. त्यात २ जलद आणि २ संथ गतीचे मार्ग आहेत, तर मेट्रो लाईनमध्ये दोन ट्रॅक आहेत. लोकलच्या भुयारी मार्गासाठी ४ ट्रॅक तयार करणार की दोन ट्रॅक ठेवणार?
भुयारी पर्याय
प्रत्येक मार्गिकसाठी स्वतंत्र भुयार
दोन मार्गिकांसाठी एक भुयार
चर्चगेट ते मुंबई सेंट्रलसाठी भुयारी मशीन वापरणे शक्य
शक्य झाल्यास हे भुयार पुढे महालक्ष्मी किंवा लोअर परळपर्यंत नेता येऊ शकते.
मध्य रेल्वेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सँडहर्स्ट रोडपर्यंत ४ हजार ४८६ स्क्वेअर मीटर जागा आवश्यक आहे, तर २२१६ स्क्वेअर मीटरची जागा खासगी मालकांकडून विकत घ्यावी लागेल. यामध्ये कायदेशीर अडचणी येऊ शकतात. त्यात वेळ जाऊ शकतो आणि आर्थिकदृष्ट्या खर्चिक पडू शकते.
अंदाजित खर्च : मेट्रो-३ (ॲक्वा लाईन ३३.५ किलोमीटर भुयारी) 37,000 कोटी
फायदे असे...
लोकल सेवा सुधारू शकते
उपनगरी भागात जादा लोकल सोडता येऊ शकतील