मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी बांधण्यात येणार्या आकांक्षी शौचालयांच्या बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केल्यानंतर याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांची चौकशी करावी आणि या कामांना स्थगिती द्यावी, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. या प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांच्या स्तरावर अतिरिक्त आयुक्तांची पुढील एका महिन्यात चौकशी करून नियमबाह्य काम झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही अध्यक्षांनी दिले.
मुंबईतील आकांक्षी शौचालयांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजप आमदार अमित साटम यांनी लक्षवेधीद्वारे गुरुवारी विधानसभेत मांडला. त्यांनी सांगितले की, या प्रकल्पांतर्गत 14 शौचालयांसाठी 20 कोटींची निविदा मंजूर झाली आहे. ए वॉर्डमधील पाच ठिकाणी कामही सुरू झाले आहे. एका शौचालयासाठी सव्वा कोटी ते पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. एवढ्या मोठ्या खर्चातून अशी कोणत्या पद्धतीची शौचालयेे बांधली जात आहेत? ही शौचालयेे सार्वजनिक फुटपाथवर उभारली जात असून महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ धोरणाचा यामुळे स्पष्ट भंग झाला आहे.
ही केवळ शौचालये नसून महापालिकेनेच केलेले अतिक्रमण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीने यास विरोध दर्शवला होता. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप साटम यांनी केला. या शौचालयांसाठी इतका मोठा खर्च का केला जात आहे? कोणते विशेष तंत्रज्ञान वापरले जात आहे? यात कोणाचे हितसंबंध आहेत याची चौकशी व्हावी. तोपर्यंत सर्व कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, या प्रकल्पाची चौकशी केली जाईल आणि ती 30 दिवसांत पूर्ण होईल. चौकशीत नियमभंग झाल्याचे सिद्ध झाल्यास, संबंधित अधिकार्यांवर कारवाई केली जाईल.
एका शौचालयासाठी 1 कोटी 75 लाख रुपये खर्च का ? असा सर्वसामान्य मुंबईकरांना प्रश्न पडला आहे. एवढ्या रकमेत एक आलिशान बंगला उभा राहू शकतो. त्यामुळे शौचालयात अशी कोणती आलिशान सुविधा देणार असा प्रश्न पडतो. त्यामुळे या योजनेत कंत्राटदार व त्यांना कंत्राट मिळवून देणारे अधिकारी स्वतःचे खिसे तर भरत नाही ना, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आकांक्षा शौचालय योजना स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशभरात राबविण्यात येत आहे. मुंबईत याची अंमलबजावणी महापालिका विसर्जित झाल्यानंतर करण्यात आली सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या कार्यकाळात काही आकांक्षा शौचालये बांधण्यात आली. यासाठी तत्कालीन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जिल्हा नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला होता. अलीकडेच कुलाबा परिसरात 14 आकांक्षा शौचालये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी या शहर विभागाच्या प्रमुख असून घनकचरा विभागाअंतर्गत शौचालय बांधण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे आकांक्षा शौचालयाच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर येते. शौचालयाच्या निविदा प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नसला तरी, निविदा प्रक्रियेची प्रत्येक माहिती प्रमुख या नात्याने त्यांना द्यावी लागते. त्यामुळे शौचालयाच्या निविदा प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी जोशी यांचीच आहे.