Mumbai Flyovers Inauguration: मुंबईतील तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण; ५९ मिनिटांत मुंबई संकल्पाला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड मार्गावरील पुलांचे लोकार्पण
Mumbai Flyovers Inauguration
Mumbai Flyovers InaugurationPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यात येत आहे. या गतिमान पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात पोहचण्यासाठी ' ५९ मिनिटांत मुंबई ' संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई महानगरातील 'मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी'च्या कामामुळे वेगवान संपर्क जोडणीसह नागरिकांच्या 'इज ऑफ लिविंग' मध्ये कमालीची सुधारणा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या तीन महत्त्वपूर्ण उड्डाणपुलांचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलाचा यात समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानावरून दृकश्राव्य माध्यमाद्वारे या पुलांचे लोकार्पण केले.

Mumbai Flyovers Inauguration
Mahavitaran solar projects: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा फायदा; महाराष्ट्रात वीजमागणीचा विक्रम

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार हे ऑनलाइन पद्धतीने तर विद्याविहार येथील कार्यक्रमातून आमदार राजहंस सिंह, पराग शहा, महापौर रितु तावडे, उपमहापौर संजय घाडी, यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महानगरात उत्तर -दक्षिण आणि पूर्व-पश्चिम अखंड संपर्कव्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. विद्याविहार, गोरेगाव पूर्व आणि शीव येथील तीनही पूल प्रकल्प धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचे असून, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होईल.

पूर्व-पश्चिम संपर्कासाठी गोरेगाव मुलुंड जोडा रस्ता (जीएमएलआर) हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकावरील पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या भागातील प्रवासासाठी यापूर्वी सुमारे ३० मिनिटे लागत होती. आता हे अंतर १० मिनिटांत पार करता येईल. त्यामुळे घाटकोपर स्थानकावरील उड्डाणपुलाचा वाहतूक भारही कमी होण्यास मदत होईल.

गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शन परिसरातील उड्डाणपूल आणि उन्नत गोलाकार रस्ता प्रकल्पाची रचना प्रभावी पद्धतीने करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरी हॉटेल जंक्शन तसेच लगतच्या चौकांतील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होईल. पूर्व-पश्चिम संपर्कक्षमता वाढविण्यासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

Mumbai Flyovers Inauguration
Mumbai FDA Action: रंगाचा संशय असलेले वेफर्स, फरसाण, जिलेबी केली जप्त; एफडीएचा दणका

शीव रेल्वे स्थानकावरील जुना पूल ११२ वर्षांचा आणि असुरक्षित झाला होता. नवीन पूल वाहतुकीसाठी उपयुक्त ठरण्याबरोबरच पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम हाती घेणे शक्य करणार आहे. या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलची संख्या आणि वारंवारता वाढविता येईल व त्याचा प्रवाशांना मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पांच्या माध्यमातून शहराची संपर्कव्यवस्था वेगाने विकसित होत असल्याचे मुखमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नवीन शीव पूल पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गाला धारावी, वांद्रे व बीकेसी या पश्चिमेकडील भागांशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या समन्वयातून अनेक मोठे प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत. तिन्ही स्तरांवरील यंत्रणांच्या समन्वयामुळे ही कामे वेळेत पूर्ण होत आहे. या सुविधांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होत आहे.

या कामगिरीबद्दल मनपा प्रशासन आणि अभियंते, कंत्राटदार, अधिकारी आणि कामगारांचे त्यांनी अभिनंदनही केले. प्रास्ताविक मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले. यावेळी अतिरिक्त मनपा आयुक्त अभिजित बांगर, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उपस्थित होते.

शीव रेल्वे पूल -

हा ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित झाल्यामुळे आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान ५ व्या व ६ व्या रेल्वे मार्गिकेच्या विस्तारासाठी त्याची पुनर्बांधणी हाती घेण्यात आली.यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होईल.

विद्याविहार उड्डाणपूल (पूर्व व पश्चिम जोडणारा) -

विद्याविहार पूर्व आणि पश्चिम परिसराला थेट जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे या पुलाचे बांधकाम करण्यात आले. पूर्वेकडील आर. सी. मार्ग आणि पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्ग यांमधील प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांवरून अंदाजे १० मिनिटांवर येणार आहे.

गोरेगाव - मुलुंड जोड रस्त्यावरील उड्डाणपूल

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये जलद व सुरळीत वाहतूक सुविधा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत सहज व जलद वाहतूक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news