मुंबई : दादरच्या कबुतरखान्यावर बंदीसाठी पुढाकार घेतलेल्या मुंबई महापालिकेने उपनगरांतील 13 ठिकाणी नवे कबुतरखाने उभारण्याची तयारी केली आहे. याला उपनगरांतून तीव्र विरोध होत आहे. आम्ही गिरगावकर संस्थेने पुन्हा एकदा जिथे कबुतरखाना तेथे चिकन सेंटर उभारण्याचा इशारा दिला आहे, तर महापालिका एका समाजाचे लाड पुरविण्यासाठा हा अट्टाहास करीत असल्याचा आरोपही होत आहे.
हायकोर्टाच्या आदेशानुसार दादर कबुतरखान्यासह मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्यात आले. मात्र मुंबईत कबुतरखाने सुरू करण्यासाठी जैन समुदाय व काही राजकीय नेते प्रयत्नशील आहेत. उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अलीकडे नॅशनल पार्कमध्ये कबुतरखान्याचे लोकार्पण केले आहे. महापालिकेने शहर व उपनगरातील 25 विभाग कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांमार्फत जागेचा शोध घेतला. शहर विभागात दक्षिण मुंबई ते मध्य मुंबईमध्ये कुठेच कबुतरखाना तयार करण्यासाठी जागा मिळाली नाही.
सांताक्रूझ, वांद्रे, खार पूर्वेला एच-पूर्व विभागासह मालाड पूर्व, अंधेरी पूर्व व गोरेगावमध्येही जागा मिळाली नाही. मात्र अन्य विभागांत 13 ठिकाणी जागा मिळाल्या आहेत, मात्र, नेमकी ही जागा कुठे आहे हे सांगण्यास पालिकेच्या उपायुक्तांनी नकार दिला. शोधण्यात आलेल्या जागेचा अहवाल नकाशासह हायकोर्टात लवकरच सादर करण्यात येणार आहे. या अहवालात कबुतरखान्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याबाबतही पालिकेकडून कोर्टात स्पष्टीकरण देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. वांद्रे पश्चिम येथील रोहन शिंदे यांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा सगळा खटाटोप केला जात असल्याचे सांगितले, तर गोरेगाव पूर्वचे सतीश मयेकर यांनी मराठी-मारवाडी वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून मुंबई पालिका पैसेवाल्यांच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप केला आहे.