Mumbai News | एकाच तिकिटावर लोकल, बस, मेट्रो प्रवास

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच सिंगल प्लॅटफार्म अॅप, मुख्यमंत्र्यांशी रेल्वे मंत्र्यांची चर्चा
Mumbai Single Ticket App
Mumbai News | एकाच तिकिटावर लोकल, बस, मेट्रो प्रवासfile photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईकरांना लोकल, बस आणि मेट्रोचा तसेच इतर वाहतुकीच्या साधनांमधून प्रवास एकाच तिकिटावर करता यावा आणि शहरी प्रवासात सुलभता यावी यासाठी सिंगल प्लॅटफार्म अॅप विकसित केले जात असून हे अॅप लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या अॅपच्या निर्मितीच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे शनिवारी 'इंटिग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्विसेस' (तिकीट प्रणालीचे एकात्मीकरण) संदर्भातील बैठकीत आढावा घेण्यात आला.

यावेळी महामुंबई मेट्रो, मध्य तसेच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई मेट्रो, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, महा मुंबई मेट्रो, बेस्ट, उबर, ओला, राज्य परिवहन बसेस आणि लोकल रेल्वे या ओपन सोर्सवर एकत्र आणल्या आहेत. या अॅपद्वारे मुंबई लोकलचे ८० लाख प्रवासी आणि बेस्टचे ३२ लाख प्रवासी एकाच अॅपवर अनेक सार्वजनिक वाहतूक पद्धतीने प्रवासाचे नियोजन करू शकतील. या प्रकल्पामुळे प्रवाशांना सहजगत्या एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व वाहतूक सुविधा मिळतील. यामुळे वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसेच वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस मुंबईतील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. शहरी वाहतुकीसाठी समर्पित अशा सिंगल प्लॅटफॉर्म अॅपचा आज आढावा घेण्यात आला. या एकाच सिंगल अॅपवर मेट्रो, मोनोरेल, बेस्ट बस तसेच उपनगरीय रेल्वे (लोकल रेल्वे) जी मुंबई शहराची लाईफलाइन म्हणून ओळखली जाते, ती देखील यावर उपलब्ध असेल. या एकच अॅपद्वारे प्रवासी आपल्या प्रवासाचे व्यवस्थितपणे नियोजन करू शकतात. सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. हे अॅप मुंबईतील प्रवाशांसाठी गेम चेंजर ठरेल, तसेच यामुळे वाहतूक सुलभ होईल आणि संपूर्ण शहरात कनेक्टिव्हिटी वाढेल. लवकरच लाँच होत असलेले हे अॅप प्रवाशांच्या अनुभवाची पुनर्परिभाषा आणि शहरी गतिशीलता पूर्वी कधीही न पाहिलेल्या पद्धतीने वाढवेल असेही फडणवीस म्हणाले.

कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर

या अॅपद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तीला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे त्याच्या जवळ असणारे स्टेशन किंवा कोणती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्याच्या जवळ आहे, हे कळू शकेल. तसेच वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा मोठा वेळ यामुळे वाचणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

३०० नव्या लोकल सुरू करणार

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात सांगितले की, मुंबईत सध्या ३ हजार ५०० लोकल सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी ३०० लोकल सेवा सुरू करण्यासाठी १७ हजार १०७ कोटींची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये १.७० लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news