

मुंबई : गाळ उपसा कामात हलगर्जीपणा करून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मेसर्स भूमिका ट्रान्सपोर्ट या कंत्राटदारास पालिकेने तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. तसेच, त्याची महापालिकेतील अभियांत्रिकीविषयक नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
एम पश्चिम विभागातील कामांदरम्यान कंत्राटदार गाळासोबतच राडारोडा मिश्रण करून पर्यायाने गाळाचे वजन वाढवत असल्याची तक्रार पर्जन्य जल वाहिनी विभागास प्राप्त झाली होती. या तक्रारीसमवेत व्हिडिओ देखील प्राप्त झाला होता. ज्यात वाहनाचा क्रमांक दिसत होता. या वाहन क्रमांकाच्या आधारे हे वाहन कोणत्या कंत्राटदाराकडे नोंदणीकृत आहेे, याची माहिती काढण्यात आली.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या आधारे त्या वाहनाच्या इतर खेपांची तपासणी करण्यात आली. त्यात राडारोडा मिश्रित गाळ वाहतूक करण्यात आल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी कंत्राटदाराला 28 एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीच्या उत्तरादाखल कंत्राटदाराने 30 एप्रिल रोजी तसेच 7 मे रोजी खुलासा सादर केला. मात्र हा खुलासा समाधानकारक नसल्याने कंत्राटदाराने जाणीवपूर्वक पालिकेची फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यामुळे कंत्राटदाराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले.