

Customer bites shopkeeper finger
मुंबई : दिंडोशी परिसरात किरकोळ वादातून हिंसक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सामोसा आणि कटलेट खाल्ल्यानंतर बिलावरून वाद घालत एका ग्राहकाने थेट दुकानमालकाच्या बोटालाच चावा घेतल्याची घटना घडली आहे.
दिंडोशी भागात रणजित सिंह हे फास्टफूडचे दुकान चालवतात. २८ मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास लक्ष्मीधीर मलिक नावाचा ग्राहक त्यांच्या दुकानात आला. त्याने सामोसा आणि कटलेट खाल्ले. मात्र, बिल दिल्यानंतर “इतके पैसे कसे?” असा सवाल करत त्याने दुकानदाराशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढत जाऊन मलिक याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने ऑनलाईन पद्धतीने पैसे भरले, तरीही त्याचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर दुकानमालक रणजित सिंह यांनी त्याला दुकानातून निघून जाण्यास सांगितले.
यामुळे संतप्त झालेल्या मलिकने अचानक सिंह यांच्या अंगावर धाव घेतली आणि त्यांच्या हाताच्या बोटाला चावा घेतला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर जखमी दुकानमालकाने दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.