

मुंबई : कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ न देता मुंबई पोलिसांनी सामंजस्याने, चर्चेद्वारे मुंबई भोंगेमुक्त केली. मुंबईतील 1 हजार 149 आणि राज्यभरातील 3 हजार 367 भोंगे उतरविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. यापुढे धार्मिक स्थळावर भोंगे लागल्यास त्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरले जाईल. तसेच, यापुढे भोंग्यासाठी प्रत्येक पोलिस आयुक्तालयांतर्गत भरारी पथक नेमण्यात येणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.
धार्मिकस्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवरील कारवाईबाबत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राने भोंग्यांबाबत मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली आहे. मुंबई पोलिसांचे विशेष कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, 1 हजार 608 भोंगे हटवताना चर्चा करून, न्यायालयाचा आदेश दाखवून आणि समंजसपणे कारवाई केली. यामुळे कुठेही धार्मिक तणाव निर्माण झाला नाही, तसेच एकही एफआयआर दाखल करण्याची गरज पडली नाही. मुंबईला भोंगेमुक्त करण्याचे श्रेय पोलिसांना जाते. एसओपीची अंमलबजावणी सातत्याने सुरू आहे. जर पुन्हा कुठे भोंगे लावले गेले, तर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरले जाईल. यासंदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. ‘उबाठा’ गटाचे आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या चर्चेत भाग घेतला.