TB Cases Mumbai : मुंबईत क्षयरोगाचा विळखा कायम

तीन वर्षांत १.३३ लाख रुग्ण; मालाड, दादर, अंधेरी परिसर सर्वाधिक रुग्ण
TB Cases Mumbai
TB Cases Mumbaipudhari photo
Published on
Updated on

मुंबई : राज्य शासन आणि मुंबई महापालिकेकडून क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी मुंबईवरील क्षयरोगाचा विळखा अद्याप कायम असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत महानगरात तब्बल १ लाख ३३ हजार ४१० क्षयरुग्णांची नोंद झाली असून मालाड, दादर, अंधेरी पश्चिम, गोवंडी आणि घाटकोपर हे भाग सर्वाधिक प्रभावित ठरले आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०२३ ते २०२५ या कालावधीत फुफ्फुसातील (पल्मोनरी) आणि फुफ्फुसाबाहेरील (एक्स्ट्रा पल्मोनरी) क्षयरुग्णांची संख्या चिंताजनकरीत्या मोठी राहिली आहे. २०२३ मध्ये ४८ हजार २८०, २०२४ मध्ये ४६ हजार ७८४, तर २०२५ मध्ये ३८ हजार ३४६ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे क्षयरोगाचे आव्हान अद्याप कमी झालेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

TB Cases Mumbai
COVID Lockdown Impact | कोरोना काळातील लॉकडाऊनचा कर्करोग निदानावर घाला!

मुंबईतील दाट लोकवस्ती, स्थलांतरितांची मोठी संख्या, कुपोषण, मधुमेह आणि वाढते प्रदूषण ही क्षयरोगाला पोषक ठरणारी प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. २०२५ मधील आकडेवारीनुसार मालाडमध्ये सर्वाधिक ९ हजार ८३३ रुग्णांची नोंद झाली असून दादरमध्ये ९ हजार १७, अंधेरी पश्चिममध्ये ८ हजार ८७, गोवंडीत ७ हजार २७३ आणि घाटकोपरमध्ये ७ हजार ९६ रुग्ण आढळले आहेत.

राज्यातही वाढती लागण

दरम्यान, राज्यातही क्षयरोगाचा वाढता भार चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात ६ लाख १२ हजार ३१७ क्षयरुग्णांची नोंद झाली असून दरवर्षी सरासरी दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ‘टीबीमुक्त महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिक व्यापक जनजागृती आणि प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

TB Cases Mumbai
Mumbai Government Hospitals: मुंबईतील शासकीय रुग्णालयांत डासांची वाढ; डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढला

जागरूकता हाच बचाव

दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला, वजन घटणे, ताप येणे, रात्री घाम येणे किंवा सतत थकवा जाणवत असल्यास त्वरित तपासणी करून घेणे आवश्यक आहे. वेळेत निदान आणि संपूर्ण औषधोपचार केल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.

"मुंबईत दरवर्षी सरासरी ५० हजारांहून अधिक क्षयरुग्ण आढळतात. यामध्ये मुंबईबाहेरील रुग्णांचाही समावेश असतो. अशा रुग्णांना त्यांच्या राहत्या ठिकाणी उपचारांसाठी ट्रान्सफर करण्यात येते. क्षयरोग हा दीर्घकालीन आजार असल्याने जास्तीत जास्त जनजागृती होणे आवश्यक आहे."

डॉ. दक्षा शहा कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news