Mumbai rain : मुंबई पावसाची संततधार; अनेक ठिकाणी पाणी तुंबले

मुसळधार पाऊसाची शक्यता कुलाबा वेधशाळेचा अंदाज
Mumbai Rains Updates
मुंबई पावसाची संततधार सुरू. Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : मुंबई शहरात पाऊस पूर्णपणे सक्रिय झाला असून शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. अधून मधून पडलेल्या पावसाच्या जोरदार सरीमुळे सायन रोड नंबर २४, गांधी मार्केट, अंधेरी सबवेसह अन्य ठिकाणी नेहमीप्रमाणे पाणी तुंबले. रस्त्यावरील वाहतूकही मंदावल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गासह एलबीएस व अन्य काही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. तर मध्य व पश्चिम रेल्वेच्या लोकल ५ ते १० मिनिट विलंबाने धावत होत्या.

मुंबई शहर व उपनगरात गेल्या दोन दिवसापासून पाऊस सर्वत्र सक्रिय झाला आहे. शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत शहर विभागात सुमारे ३२ मिमी पाऊस झाला. पूर्व उपनगरात २८ मिमी तर पश्चिम उपनगरात ३० मीमी पावसाची नोंद झाली. अधून मधून पडलेल्या मुसळधार सरीमुळे असल्फा लास्ट बस स्टॉप, शितल तलाव, त्रिमुर्ती सोसायटी, चुनाभट्टी वेलकम हॉटेल घाटकोपर, खार सबवे, मिलन सबवे आकृती मॉल अंधेरी (पू), गुलमोहर इर्ला जंक्शन, नेताजी पालकर रोड आदी भागात पाणी तुंबले होते. बोरीवली पश्चिमेला धर्मानगर, फॉरेस्ट ऑफिस समोर, साईनाथ वेल्फेअर सोसायटी येथे चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची तक्रार माजी नगरसेवकांनी बोरिवलीच्या आर मध्य विभागात केली होती. त्यानुसार दुपारी पाण्याचा निचरा करण्यात आला. पावसामुळे उपनगरातील अनेक रस्ते वाहतूक कोंडीत सापडले होते. एस. व्ही. रोड, लिंकिंग रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, कुर्ला घाटकोपर एलबीएस मार्ग, व अन्य काही रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. या बेस्टच्या बस अडकून पडल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. दुपारनंतर पावसाचा जोर थोडा ओसरला. मात्र पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावरील लोकल विलंबाने धावत होत्या.

शॉक लागून एकाचा मृत्यू !

अँटॉप हिल चर्च, कोकरी आगार, ऍन्टॉप हिल येथील सागर मित्र मंडळ या चाळीतील सामाईक मीटर केबिनमध्ये दुरुस्तीकरीता गेलेल्या एका ६० वर्षीय इसमास दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शॉक लागला. त्यामुळे या इसमास तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

१६ ठिकाणी झाडे कोसळली

पाऊस व वारा यामुळे शहरात १६ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्या मात्र यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. अग्निशमन दल व उद्यान विभागाने तातडीने झाडे व झाडाच्या फांद्या हतवल्या. पाच ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या तर दोन ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या मात्र यात कुणालाही मार लागला नाही.

मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. यावेळी ४५ ते ५५ प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news