

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नुकत्याच झालेल्या प्रोपिलीन गॅस टँकर अपघातामुळे निर्माण झालेल्या 28 तासांच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला टोल परत करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. काँग्रेस सदस्य भाई जगताप यांनी विचारलेला प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर अडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर टँकरमधून अत्यंत ज्वलनशील वायूची गळती सुरू झाली. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. ज्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.
कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने मध्य भागातील बॅरियर हटवून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुणे मार्गावरून वळवली होती. तसेच जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरूनही काही वाहतूक वळवण्यात आली होती.कोंडीत अडकलेल्या लहान मुलांना, वृद्धांना आणि इतर प्रवाशांना आय.आर.बी. आणि स्थानिक पोलिसांमार्फत पाणी, बिस्किटे व अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले होते.
भविष्यासाठी तज्ज्ञ समिती
भविष्यात अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करण्यासाठी आणि एक्झिट प्लॅन तयार करण्यासाठी भारतीय रस्ते महासभेचे माजी अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.