

ठळक मुद्दे
२०१७ आणि २०२२ मध्येही मोठ्या प्रमाणावर हरकती
सन २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग रचनेवर ६१३ हरकती व सूचना नोंदल्या गेल्या होत्या.
२०२२ मध्ये २३६ प्रभाग रचनेवर ८९२ हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या.
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार याची सर्वच राजकीय पक्ष, माजी नगरसेवक आणि नागरिकांनाही प्रतीक्षा आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग फेररचना व त्यासंबंधी वेळापत्रक निवडणूक आयोगाने तयार केल्याने अखेर निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे.
महापालिकेने २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. या कालावधीत सायंकाळपर्यंत एकूण ४१० हरकती आणि सूचनांची नोंद झाली. यात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
महापालिकेने हरकती सूचना पाठवण्याचे आवाहन केल्यानंतर २२ ते ३० ऑगस्ट या नऊ दिवसांत फक्त १७ हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. मात्र ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या अवघ्या चार दिवसांत १५४ हरकती व सूचना दाखल झाल्या. तर शेवटच्या दिवशी म्हणजे ४ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंतच ३५६ हरकती व सूचनांची भर पडली. त्यामुळे एकूण संख्येत झपाट्याने वाढ झाली असून या पाच दिवसांत मिळून तब्बल ३९३ हरकती व सूचना नोंद झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान महापालिकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान या हरकती व सूचनांवर सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी महापालिकेचे माजी आयुक्त तथा वरिष्ठ सनदी अधिकारी इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.