

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर
शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसमवेत मुंबईत निवडणूक लढणे भाजपला मान्य असले तरी मुंबईतील सुमारे पन्नास वॉडाँत नेमकी लढायचे कोणी, हा प्रश्न कळीचा ठरणार असल्याने तो लवकरच सोडवावा लागणार आहे! शिंदे यांच्या दिल्लीभेटीनंतर हा विषय लवकरात लवकर सोडवायचा, असे ठरले आहे.
कल्याण-डोंबिवली येथे युती होणार नाही, ठाणे येथे काय, याचा अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकत्र लढायचेच आहे, हे ठरले असल्याने आता जागावाटपाच्या कळीच्या मुद्द्यापर्यंत पोहोचावे लागणार आहे. यासंबंधीची चर्चा सुरू होईल, तेव्हा मुंबईतील ५० वॉर्डात नेमकी निवडणूक लढवायची कोणी, हा प्रश्न गुंतागुंतीचा होणार असल्याची कबुली दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
शिंदेंकडे गेलेले ४४ नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाडून जिंकले होते. अत्यंत कडव्या सामन्याला सामोरे गेले होते. केवळ काही मतांच्या सरशीमुळे ही जागा शिवसेनेने जिंकली होती. गेल्या निवडणुकीपेक्षा आता परिस्थिती बदलली आहे. या जागा नेमक्या कोणी लढायच्या हा वादाचा मोठा मुद्दा दोन्ही पक्षांमध्ये निर्माण होणार आहे. दहिसर, गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरी, विक्रोळी, घाटकोपर या परिसरांतील काही ठिकाणी कडवी लढत झाली. ती लक्षात घेता आता नेमकी जागा कोणी लढायची हा मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे.
शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या ४४ नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवकांना भारतीय जनता पक्षाने कडवी झुंज दिली होती. ही झुंज आता अधिक तीव्र होईल. तेव्हा शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक शिंदे गटात गेले. ही मंडळी उमेदवारीचे आश्वासन मिळाले असल्यामुळे शिंदे गटात गेली होती, असे मानले जाते. मात्र या सर्व गटांमध्ये आता शिवसेना उबाठाचे उमेदवार उभे राहतील. राज ठाकरे यांची त्यांना साथ मिळाली तर त्यांची मतसंख्या वाढेल. गद्दारांना धडा शिकवा हीं भाषा सुरू होईल. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल. शिंदे गटाकडे गेलेल्या नगरसेवकांना निवडून येणे सोपे राहणार नाही.
उलटपक्षी थोडक्यात, मागच्या निवडणुकीत, जागा गमवाव्या लागलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी सेनेची मते विभाजित होणे हे जिंकण्याचा मार्ग मोकळा करून देणारे असेल, असे मानले जाते आहे. त्यामुळे या वार्डामध्ये काय करायचे हा महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा नोव्हेंबरच्या मध्यावर होईल असे गृहीत धरले तर हा प्रश्न येत्या काही दिवसांतच सोडवावा लागेल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिली. सध्या भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला समवेत घेऊन चालण्याच्या मनःस्थितीत आहे. आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे दूर करणार नाही. मात्र विजयी होण्याची शक्यता असलेल्या पक्षानेच निवडणूक लढवणे योग्य ठरेल, असे मतही या नेत्याने व्यक्त केले. शिंदे गटात याच भावना व्यक्त केल्या जात असल्या तरी मुंबई हे शिवसेनेचे शक्तिस्थळ असल्यामुळे येथे शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला भाजपने झुकते माप देणे अपेक्षित असल्याचेही बोलले जाते आहे. जागा वाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी येत्या काही दिवसांतच बैठकसत्राला प्रारंभहोण्याची शक्यता आहे.
धंगेकरांवर कारवाई?
दरम्यान युतीतील सौहार्द हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते जाणून आहेत. पंतप्रधान मोदी यांनाही याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला असल्यामुळे बेबनाव निर्माण करणाऱ्या काही चेहऱ्यांवर लवकरच कारवाई होण्याची चिन्हे आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना टीकेचे लक्ष्य करणाऱ्या शिवसेना शिंदे गटात नुकत्याच प्रवेश केलेल्या रवींद्र धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याचा विचार गांभीयनि केला जातो आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना काही दिवसांपूर्वी समज दिली होती असे म्हणतात. त्यानंतर त्यांनी समाज माध्यमांवरून पक्षाचे चिन्ह काढून टाकले होते. तरीही धंगेकर यांचे आरोपसत्र संपत नसल्याने भारतीय जनता पक्षात नाराजी व्यक्त केली जाते आहे. धंगेकर यांना समज घेऊ नये, ते शांत होत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल काय यावर शिंदे गटात गंभीरपणे विचार होत असल्याचे समजते. सध्या शिंदे आणि भाजप यांच्यात मध्यस्थाची भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत करत असून त्यांची यासंदर्भात शिंदेंशी चर्चा होणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.