

मुंबई: भारतात बेकायदा प्रवेश करून मुंबईत वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत ५००हून अधिक बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमांचाही समावेश आहे.
दरम्यान, भारतातून हद्दपार केल्यानंतर पुन्हा मुंबईत दाखल झालेल्या २७ वर्षीय बांगलादेशी महिलेला रविवारी गावदेवी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे हद्दपारीनंतरही पुन्हा भारतात प्रवेश करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गावदेवी पोलिसांनी रविवारी २७ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक केली.
संबंधित महिलेला यापूर्वी भारतातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीनंतर ती पुन्हा भारतात दाखल होऊन मुंबईत राहत असल्याचे तपासात समोर आले. ती भारतात पुन्हा कशी आली, कोणत्या मार्गाने प्रवेश केला आणि तिला भारतात येण्यासाठी किंवा मुंबईत वास्तव्य करण्यासाठी कोणी मदत केली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे हद्दपारीनंतर पुन्हा भारतात प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे नेटवर्क पोलिसांच्या रडारवर आले आहे.
बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिक असल्याचे भासविण्यासाठी बनावट आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड किंवा पासपोर्ट उपलब्ध करून देणाऱ्या एजंटांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. काही प्रकरणांत बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत वास्तव्य केल्याचे तपासात समोर आले आहे.
मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्ट वापरणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे बेकायदा प्रवेशासोबतच बनावट कागदपत्रांचे नेटवर्क आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींचाही तपास सुरू आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांविरोधातील कारवाई सुरू राहणार असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एखादा परदेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिस ठाण्यात, मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.
हद्दपारीनंतर ‘रिएंट्री’चे आव्हान
हद्दपारी झाल्यानंतर पुन्हा भारतात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची प्रकरणे समोर येत असल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. अशा नागरिकांचा भारतात प्रवेशाचा मार्ग, सीमावर्ती भागातील संपर्क, मुंबईत राहण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती तसेच बनावट कागदपत्रांचे नेटवर्क यांचा तपास केला जात आहे.
मालाड ते बोरिवलीपर्यंत धडक
यंदाच्या कारवायांमध्ये मुंबईच्या विविध भागांचा समावेश आहे. मालाड, वर्सोवा, अंधेरी, कामाठीपुरा, धारावी, घाटकोपर, बोरिवली तसेच मुंबई विमानतळ परिसरात बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी जूनमध्ये सात बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. हे नागरिक दीर्घकाळापासून भारतात बेकायदा राहत असल्याचा आरोप आहे. कामाठीपुरा परिसरातही बांगलादेशी महिलांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
तीन वर्षांत १,८०० ताब्यात
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू आहे. मागील तीन वर्षांत १,८०० जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील नव्या वर्षातील ऑगस्ट २०२६ पर्यंत ५०० जणांना अटक केली आहे.
एकूण त्यापैकी १,२३८ जणांची हद्दपारी करण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आली.
क्राइम ब्रँचकडून ३७ जणांवर कारवाई
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई गुन्हे शाखेनेही विशेष मोहीम राबविली. गेल्या महिन्यात क्राइम ब्रँचच्या पथकाने विविध भागांत कारवाई करून ३७ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या नागरिकांची कागदपत्रे, राष्ट्रीयत्व आणि भारतात प्रवेशाचा मार्ग तपासण्यात आला. वैध कागदपत्रे नसलेल्या नागरिकांविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पात्र प्रकरणांमध्ये हद्दपारीची कार्यवाही केली जात आहे.