

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी ( Salman Khan Death Threats) मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून बिकाराम जलाराम बिश्नोई याला अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताने आपण लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा केला आहे. बिकाराम बिश्नोई (Bikaram Jalaram Bishnoi) हा मूळचा राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आला होता.
बिकाराम हा मूळचा राजस्थानचा आहे. नुकताच तो हावेरीत कामासाठी आला होता. येथील मजुरांच्या खोलीत तो राहात असे. हावेरी येथे खिडक्यांचे काम करत असताना मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. बिकाराम हावेरीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, अनेक दिवस त्याचा सुगावा लागत नव्हता. त्याने आपला मोबाईल बंद ठेवला होता. परंतु, त्याने ज्यावेळी आपला मोबाईल सुरू केला त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
मुंबईच्या ट्रॅफिक नियंत्रण कक्षाला अभिनेता सलमान खानसाठी एक धमकीचा मेसेज आला होता. मेसेज पाठवणाऱ्याने स्वत:ला लॉरेन्स बिश्नोई गँगमधील असल्याचे म्हटले होते. मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या या मेसेजप्रकररणी वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Salman Khan)
"मी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. जर सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी अथवा ५ कोटी रुपये द्यावेत. जर त्याने असे केले नाही तर आम्ही त्याला मारून टाकू, आमचा गँग अजूनही सक्रिय आहे.'' अशी धमकी देण्यात आली आहे.