Mumbai Poisoning Case : पायधूनी विषबाधा प्रकरणात खळबळजनक खुलासा; मयत अब्दुल्ला होता फसवणूक प्रकरणातील मुख्य साक्षीदार

Mumbai Poisoning Case Shocking Twist : मुंबईतील पायधूनी परिसरात घडलेल्या विषबाधा प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे.
Mumbai Paydhuni Poisoning Case Shocking Twist
Published on
Updated on

Mumbai Paydhuni Poisoning Case Shocking Twist

मुंबई : दक्षिण मुंबईतील पायधूनी परिसरात घडलेल्या विषबाधा प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या घटनेत मृत्यू पावलेला तरुण, अब्दुल्ला डोकाडिया, हा एका जुन्या आणि गंभीर गुन्ह्यातील महत्त्वाचा साक्षीदार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या खुलाशामुळे अब्दुल्लाचा मृत्यू हा केवळ अपघात होता की त्यामागे एखादा मोठा कट रचला गेला होता, यादृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत.

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१९ मध्ये डी. एन. नगर पोलीस ठाण्यात एका फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. जोगेश्वरीतील एका बड्या बिल्डरने एका महिलेकडून मोठी रक्कम घेतली होती. धक्कादायक बाब म्हणजे, बिल्डरने ही रक्कम स्वीकारण्यासाठी स्वतः न जाता अब्दुल्ला डोकाडिया यांना पाठवले होते. महिलेने दिलेले हे पैसे बिल्डरने नंतर परत केले नाहीत, ज्यामुळे संबंधित महिलेने २०१९ मध्ये बिल्डरविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

साक्ष महत्त्वाची ठरणार होती

डी. एन. नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात अब्दुल्ला डोकाडिया हे केवळ मध्यस्थ नसून, ते या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. बिल्डरपर्यंत पैसे पोहोचवण्यामध्ये अब्दुल्ला यांचा थेट सहभाग असल्याने, त्यांची साक्ष या खटल्याचा निकाल फिरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. विशेष म्हणजे, दीर्घ प्रतीक्षेनंतर २०२६ मध्ये या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होणार होती.

ट्विस्टमुळे संशय बळावला

एकीकडे ७ वर्षांनंतर प्रकरणाची सुनावणी तोंडावर आलेली असतानाच, दुसरीकडे अब्दुल्ला यांचा विषबाधेमुळे झालेला मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. ज्या प्रकरणाची सुनावणी २०२६ मध्ये होणार होती, त्यातील मुख्य साक्षीदाराचा अशा प्रकारे मृत्यू होणे हा केवळ योगायोग आहे की साक्ष दडपण्यासाठी रचलेले कारस्थान, असा संशय व्यक्त केला जात आहे.

पायधूनी पोलीस आता या प्रकरणातील तांत्रिक बाबींसोबतच, २०१९ मधील त्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा आणि संबंधित विकासकाचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचा कसून तपास करत आहेत. या 'मोठ्या ट्विस्ट'मुळे आता या मृत्यू प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news