

मुंबई : कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण रविवारी प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता १५ मिनिटांत शक्य होणार आहे. २७ जानेवारी २०२५ पासून या सर्व मार्गिंकावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे. हा मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
लोकार्पण कार्यक्रमापूर्वी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवत या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलारही बसले होते. या पुलामुळे वाहतुकीवर ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते उत्तर टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यांतर्गत शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे.
या प्रकल्पातील दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी-वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यातील दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे लोकार्पण १२ सप्टेंबर २०२४ रोजी झाले. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी या दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे) जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पुलावरून नियमित दिशांकडे वाहतूक सुरू होणार आहे.
कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणाऱ्या पुलाची लांबी ८२७ मीटर इतकी आहे. यामध्ये समुद्रावर असलेली लांबी ६९९ मीटर तर पोहोच रस्ता १२८ मीटर यांचा समावेश आहे. हा पूल बांधण्यासाठी सुमारे २४०० मेट्रिक टन वजनाची तुळई (बोआर्च स्ट्रिंग गर्डर) स्थापन करण्यात आला होता. या तुळईची लांबी १४३ मीटर तर रुंदी २७ मीटर आणि उंची ३१ मीटर इतकी आहे.
मुंबई कोस्टल रोडच्या वरुन श्रेयावरुन उद्धव ठाकरे गट आणि महायुती यांच्या कलगीतुरा रंगला आहे. कोस्टल रोडची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी केली होती असा दावा ठाकरे गट करीत आहे. तर भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी केंद्राकडून सर्व परवानग्या घेतल्या होत्या, त्यामुळे कोस्टल रोड मोदींमुळे झाला असा दावा फडणवीस करीत आहेत.
कोस्टल रोडच्या रिकाम्या जागांवर राजकीय होर्डिंग्ज लावण्याची परवानगी भाजप आणि शिवसेनेच्या दबावामुळे पालिका देत असल्याचा आरोप उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने खुलाही झाला नव्हता तेव्हा पासून श्रेयासाठी होर्डींग बाजी सुरु आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हे आरोप नाकारले आहेत. कोस्टल रोडवरील रिकाम्या जागेवर होर्डिंग्ज लावले जाणार असले तरी ही जागा आमची नसल्याचे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.