

मुंबई : वाढवण बंदरामुळे भारत सागरी शक्ती बनणार आहे. वाढवण बंदर हे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ असणार आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार असून ते मुंबई महानगर प्रदेशातील तिसरे विमानतळ असेल. त्याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीच्या सुविधा असून येत्या काळात 30 जिल्ह्यामध्ये या सुविधा वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हॉटेल ताज लँडस एंड बांद्रा येथे केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयाने देशाच्या पश्चिम क्षेत्रातील मंत्र्यांची परिषद आयोजित केली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय नागरी हवाई मंत्री के. राममोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन कुंटे, गुजरातचे नागरी हवाई मंत्री बलवंत सिंग राजपूत, मध्य प्रदेशचे परिवहन मंत्री उदय प्रताप सिंग यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येत आहे. एकेकाळी केवळ केंद्र सरकारचा विषय असलेली विमानसेवा आता राज्याचाही प्राधान्याचा विषय बनत आहे. जे राज्य विमान वाहतुकीला प्राधान्य देणार नाहीत ते प्रगतीत मागे पडतील अशी स्थिती असल्याने हा विषय महत्वाचा आहे. महाराष्ट्रात ग्रीन फील्ड आणि ग्राउंड फिल्ड विमान वाहतुकीला पूरक अश्या सर्व सुविधा तयार करण्याचे काम सुरू आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये नवीन विमानतळ बनवणार आहोत, तसा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाचे काम 90 च्या दशकात सुरू झाले. या कामातील विविध परवानगी घेण्यासाठी पंधरा वर्षे लागली, त्यातील सात परवानग्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकाचवेळी दिल्या. नवी मुंबईचे हे विमानतळ लवकरच कार्यान्वित होत आहे. हे विमानतळ आणि अटल सेतूमुळे प्रगतीला खूप मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. मुंबईपेक्षा तिपटीने मोठी असलेली मुंबई या परिसरात वसणार आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी राज्य बनवणार असल्याचे सांगतानाच दहिसर येथील रडारचे स्थलांतर करावे, जेणेकरून येथील परिसरातील अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. त्याचप्रमाणे डीएननगर येथील ट्रान्समिशन टॉवर स्थलांतरीत करावेत अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
विमान वाहतूक क्षेत्रात केंद्र व राज्य यांच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमणार असून लवकरच ’उडान यात्री कॅफे’ सुरू करणार असल्याचे केंद्रीय नागरी हवाई मंत्री के. राममोहन नायडू यांनी सांगितले. नवीन विमानतळांमुळे सभोवतालच्या परिसराच्या विकासाला चालना मिळेल. देशात जास्तीत जास्त विमानसेवा सुरू करून ‘कनेक्टीव्हीटी’ वाढवण्यावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्याच्या समन्वयातून पश्चिम क्षेत्रातील राज्यांचे विमान वाहतूक क्षेत्रातील प्रश्न प्राधान्याने सोडवून विमान वाहतूक सेवा अधिक गतीमान करणे हे केंद्र शासनाचे ध्येय आहे. राज्यातील विमान वाहतूकीसाठी केंद्र शासन विविध योजना राबवत आहे.