मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आरे ते बीकेसी मेट्रो ३ मार्गिकेवरील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) या शेवटच्या स्थानकात शुक्रवारी दुपारी आग लागली. त्यामुळे संपूर्ण स्थानकात धूर पसरला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बीकेसी स्थानक बंद करण्यात आले आहे.
घटनास्थळी अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहे. एमएमआरसी आणि डीएमआरसीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत, असे मुंबई मेट्रोकडून सांगण्यात आले आहे. BKC मेट्रो स्थानकासमोरील आयकर कार्यालयाजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ही आग पसरली आहे. या घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून प्रवाशांना तातडीने स्थानकातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मेट्रो ३ मार्गिका सुरू होऊन आता एक महिना लोटला आहे. या मार्गिकेवर मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडांची मालिका सुरूच आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी मेट्रो एक तास भुयारात अडकली होती. यावेळी प्रवाशांना बराच मनःस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर आज बीकेसी स्थानकाच्या ए ४ प्रवेशद्वारावर आग लागली. आगीचा धूर मेट्रो स्थानकात पसरला. त्यामुळे बीकेसी मेट्रो स्थानकातील वाहतूक बंद करण्याची वेळ मेट्रो प्रशासनावर आली. या स्थानकात प्रवाशांना प्रवेश बंद करण्यात आला असून बँड्रा कॉलनी स्थानकातून मेट्रो पकडण्यास सुचवण्यात आले आहे.