

मुंबई : मुंबईच्या विचार विश्वाचे ऊर्जा केंद्र असलेल्या एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकांना वादाचे ग्रहण लागले आहे. दि. 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठीची मतदार यादी सदोष असून काही अर्ज जाणीवपूर्वक डावलेले केले असल्याचा आक्षेप अर्ज छाननी समितीतील सदस्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे नव्याने केला असल्याचे समजते. सदोष यादी असलेल्या निवडणुका ग्राह्य कशा मानता येतील अशी विचारणा करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षात या संस्थेला आलेल्या आयकर खात्याच्या नोटिशिचाही तक्रारीत उल्लेख केला गेला आहे. सदस्यत्वासाठी अर्ज केलेल्या मतदारांची वैधता ठरवण्याबद्दलचे निकष मनमानी वापरले गेल्याचा आरोप धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या संबंधात संस्थेला छाननी समितीतील काही सदस्यांनी दिलेल्या लेखी तक्रारींची दखलही घेतली गेली नसून या अर्जाना उत्तर दिले गेले नसल्याचेही धर्मादाय आयुक्त यांच्या लक्षात आणून दिले गेले आहे. उद्या तारीख २७ रोजी धर्मदाय आयुक्तांकडे या संबंधातील सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे समजते.
१४ ऑक्टोबर रोजी सदस्यत्वाची अंतिम नोंदणी झाली होती. त्यादिवशी आलेले काही अर्ज जाणीवपूर्वक नाकारले गेले तर काही स्वीकारले गेले. या नकाराचा आणि स्वीकाराचा निकष कोणता असा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. त्यातच दाखल झालेल्या एका तक्रारीनुसार एका राजकीय पक्षाच्या खात्यातून काही सदस्यांची वर्गणी भरली गेली असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.
एशियाटिक सोसायटीच्या घटनेनुसार विशिष्ट कलमयदि पर्यंत सदस्यत्व स्वीकारले गेले तर मतदानाचा अधिकार दिला जातो. प्रत्यक्षात सदस्यत्व स्वीकारल्यानंतर एक वर्षान किंवा काही महिन्यांनी मतदानाचा अधिकार मिळायला हवा असे सांगितले जाते. मात्र त्या संबंधात कोणतीही तरतूद नसल्याने एका विवक्षित तारखेपर्यंत आलेले अर्ज स्वीकारले गेले. हे अर्ज मोठ्या प्रमाणात आले असल्यामुळे ही प्रक्रिया १८ ऑक्टोबर ची तारीख उलटून गेल्यानंतरही पुढचे तीन दिवस सुरू राहिली असाही ठपका तक्रारदारांनी केला आहे. या तक्रारदारांनी राजकीय पक्षाच्या खात्यातून काही जांची वर्गणी कशी काय जमा झाली? एकत्रित रित्या अशी सदस्य भरण्याचे कारण काय? त्यासाठी राजकीय पक्ष सक्रिय झाला होता का, असेही काही प्रश्न विचारले गेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून एशियाटिक सोसायटीचा कारभार गलथान झाला असल्याची चर्चा सुरू होती.
आयकर खात्याने त्वरित कर भरा, अशा प्रकारच्या काही नोटीस देखील या सोसायटीवर बजावल्या आहेत, असे समजते. संस्थेच्या कार्यालयात लागलेली कीड, पुस्तकांवर लागलेली उधाई असे अनेक प्रश्न समोर आलेले असतानाच आता याद्यांमधील घोळ हा विषय नव्याने चर्चेला आला आहे. या निवडणुका थांबाव्यात आणि नवीन यादी तयार करून त्यानुसार मतदान व्हावे, अशी मागणी ही धर्मादाय आयुक्तांसमोर केली जाणार आहे.
गिरगाव परिसरातील एका ऐतिहासिक साहित्य संस्थेत निवडणुकीनिमित्त सुरू झालेले वाद शमले असतानाच आता एशियाटिक सोसायटीची मतदार यादी आक्षेपार्ह असल्याचे नवे प्रकरण सुरू झाले आहे. तक्रारीचे स्वरूप हे मतदार यातील घोळावर बोट ठेवणारे असल्याने या संदर्भात नेमके काय होते आहे हे जाणून घेण्यासाठी निवडणूक अधिकारी गिरीधर रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
मुंबईच्या संस्थागत जीवनात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय विचारसरणीचे युद्ध सुरू झाले असल्याची चिंता व्यक्त केली जाते आहे. या पाश्र्वभूमीवर एशियाटिक सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेत संपूर्णतः पारदर्शकता असावी, अशी भावना सदस्य आणि संबंधीत व्यक्त करीत आहेत. दरम्यान, एशियाटिक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात वारंवार विचारणा करूनही कोणतेही उत्तर मिळाले नाही. या संदर्भात सरकारचे दरवाजे ठोठावले जातील, अशी शक्यता असल्याचेही समजते.