

मालाड : मढ - मार्वे रोडवरील दाना पाणी येथील भुल्लर स्टुडिओत आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. ही घटना सकाळी 6:15 वाजता नोंदवण्यात आली. अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचे काम हाती घेतले. सकाळी 6:48 वाजता या आगीला ‘लेव्हल-1’ घोषित करण्यात आले होते.
ही आग ग्राउंड प्लस वन इमारतीतील सुमारे तीन हजार चौरस फूट क्षेत्रातील 5 ते 6 गाळ्यांमध्ये पसरली होती. आगीमध्ये इलेक्ट्रिक वायरिंग व उपकरणे, वॉलपेपरचा साठा, फोम मॅट्रेस, कार्पेट, पीव्हीसी शीट्स, लाकडी फर्निचर, परफ्युम्स, कार्यालयीन साहित्य, शूटिंग इक्विपमेंट, एसी युनिट्स व बांबू साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 फायर इंजिन, 3 जेट टँकर, एक वॉटर टँकर, रुग्णवाहिका तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तैनात होते.घटनास्थळी पोलिस पालिका कर्मचारीही मदतीसाठी उपस्थित होते.
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी 9:12 वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही अग्निशमन दल, पोलीस पुढील तपास करत आहेत.