

मालाड: नैसर्गिक सौंदर्याने नटलेले व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मढ परिसरातील एका नामांकित रिट्रीट हॉटेलमध्ये मंगळवारी (दि. १४) सकाळी धक्कादायक व संशयास्पद घटना घडली. हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आलेल्या एका परदेशी पर्यटकाने स्वतःवर चाकूने वार केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास संबंधित पर्यटक ज्या खोलीत वास्तव्यास होता, त्या खोलीत मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळून आले. हा प्रकार लक्षात येताच हॉटेल प्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तातडीने जखमी व्यक्तीस उपचारासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान, हा प्रकार आत्महत्येचा प्रयत्न आहे की, यामागे अन्य काही गंभीर कारण आहे, याबाबत संभ्रम आहे. अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा आणि कडक नियंत्रण असलेल्या नामांकित हॉटेलमध्ये अशी घटना घडणे संशयास्पद मानले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेल परिसरात पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. संबंधित पर्यटकाची पार्श्वभूमी, हॉटेलमधील हालचाली तसेच कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.