

पुढारी ऑनलाईन डेस्क : रेल्वे हे भारतातील प्रवासाचे प्रमुख साधन आहे. त्यामध्ये मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे रोजच्या जगण्याचा एक भाग. भारतीय रेल्वे हळूहळू गाड्या सुपर फास्ट आणि विकसित करण्यात गुंतली आहे, दरम्यान भारतीय रेल्वेने आणखी एक पाऊल उचलले आहे. पश्चिम रेल्वे आजपासून मुंबई उपनगरीय भागावर 13 एसी लोकल ट्रेन सेवा सुरू करणार आहे. यानंतर एसी सेवांची एकूण संख्या 96 वरून 109 होईल. प्रवाशांमध्ये एसी लोकलची लोकप्रियता वाढत असून ही वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने आजपासून मुंबई उपनगरीय भागावर एसी लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 13 नवीन एसी सेवा सुरू केल्यानंतर शनिवार-रविवारी गाड्यांची संख्या 52 वरून 65 इतकी होणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली. या प्रसिद्धीपत्रकानुसार, एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या फायद्यासाठी आणि गर्दीला सामावून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेवर सध्याच्या नॉन-एसी 12 रेल्वेचे रुपांतर करुन आणखी 13 एसी गाड्या सुरू करण्यात येत आहेत. या रेल्वे सेवा आठवड्यातील सर्व दिवस एसी सेवा म्हणून धावतील. या एसी गाड्या चालवल्यामुळे एकूण रेल्वे सेवेत कोणताही बदल होणार नाही, 109 एसी लोकल ट्रेन सेवेची भर पडल्याने लोकल सेवेची संख्या 1406 राहील. 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या नवीन एसी लोकल ट्रेनपैकी पहिली चर्चगेट येथून 12:34 वाजता धावेल आणि त्यानंतर सर्व नवीन एसी लोकलचे नियमित संचालन खाली दिलेल्या वेळेनुसार होईल.
विनीत पुढे म्हणाले की, 13 अतिरिक्त एसी गाड्यांपैकी 6 सेवा वरच्या दिशेने आणि 7 सेवा डाऊन दिशेने आहेत. वरच्या दिशेने, विरार-चर्चगेट आणि भाईंदर-चर्चगेट दरम्यान 2-2 रेल्वे सेवा धावतील. विरार-वांद्रे आणि भाईंदर-अंधेरी दरम्यान प्रत्येकी एक एसी ट्रेन धावेल. त्याचप्रमाणे, डाऊन दिशेने, चर्चगेट-विरार दरम्यान दोन सेवा, चर्चगेट-भाईंदर, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरीवली आणि बोरिवली-भाईंदर दरम्यान प्रत्येकी एक एसी ट्रेन धावेल.